अमित सोनी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबादमध्ये एमबीए (MBA) करण्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन पुन्हा शिक्षणाकडे वळण्याच्या निर्णयामुळे मोजाव्या लागणाऱ्या खऱ्या किंमतीबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.

“७४ लाख रुपये. आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश मिळाला त्यादिवशी सरकारी नोकरी सोडण्यासाठी मला इतकी मोठी किंमत मोजावी लागली,” असा दावा सोनी यांनी केला.

अमित सोनी हे भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी (SSB) मध्ये सहाय्यक कमांडंट म्हणून कार्यरत होते. यावर्षी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देत आयआयएममध्ये १ वर्षासाठी पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम फॉर एक्झिक्युटिव्हजमध्ये प्रवेश घेतला. सोनी यांनी ७४ लाख रुपयांचा खर्च कसा झाला? याचा हिशेब दिला आहे. आयआयएममधील शिक्षणाचा खर्च, राजीनाम्यापोटी बाँड म्हणून द्यावी लागलेली रक्कम आणि एका वर्षाचा पगार व इतर लाभ सोडून दिल्याने मिळू शकणाऱ्या लाभाचा झालेला अपव्यव याची गोळाबेरीज केल्यानंतर ७४ लाख गमावल्याचे त्यांनी सांगितले.

७४ लाखांचा खर्च कसा…

अमित सोनी यांच्या मते, ७४ लाख रुपयांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या खर्चाचा समावेश आहे.

  • पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम फॉर एक्झिक्युटिव्हजसाठीची फी रु. ३७.१० लाख.
  • आंतरराष्ट्रीय इमर्शन कार्यक्रम रु. ४.५ लाख.
  • वर्षाभराच्या राहण्या-खाण्याचा खर्च रु. २.५ लाख.
  • सरकारी नोकरीचा राजीनामा देण्यासाठी बाँडची भरपाई रु. ९.८० लाख.
  • एका वर्षाचा पगार आणि नोकरीच्या फायद्यांचा त्याग रु. २० लाख.

अशा प्रकारे एकूण खर्च सुमारे ७४ लाख रुपये झाल्याचा त्यांचा दावा आहे.

सोनी यांनी सांगितले की, त्यांच्या निर्णयाबाबत त्यांच्या मनात “कोणताही दुसरा विचार” नव्हता आणि नोकरी सोडल्यानंतर पुढे काय? याचे दुसरे कोणतेही नियोजन नव्हते. केवळ मनात ठाम विश्वास होता, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले. “हा निर्णय योग्य होता का? नक्कीच.”

सरकारी नोकरीचा राजीनामा

भारतात सरकारी नोकरी स्थिरता आणि सुरक्षितता म्हणून ओळखली जाते. सरकारी नोकरी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. याचे कारण त्यात नियमित वेतन, नोकरीची सुरक्षितता आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना न मिळणारे इतर लाभ मिळतात.

“गणवेशातून बोर्डरूमपर्यंतचा हा माझ्या आयुष्यातील दुसरा अध्याय आहे,” असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर याआधीच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी या निर्णयाबद्दल सविस्तरपणे सांगितले होते; त्यांनी म्हटले होते की, त्यांना कम्फर्टपेक्षा ग्रोथची निवड करायची होती.