मध्यंतरी रसगुल्ला ही मिठाई मूळ कुणाची यावरून ओदिशाबरोबर प्रवाद झाल्यानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने चार प्रकारच्या मिठाईला भौगोलिक ओळख प्राप्त करून देण्याचे ठरवले आहे. या मिठाईच्या पदार्थावर मग कोणी दावा सांगू शकणार नाही. या चार मिठाईमध्ये जयनगरचा मोवा, कृष्णनगरची सारपुरिया, वर्धमानचा सीताभोग व मिहीदाना यांचा समावेश असल्याचे अन्न प्रक्रिया संचालक जयंतकुमार ऐकत यांनी सांगितले. भौगोलिक ओळख मिठाई मूळ विशिष्ट प्रदेशातील आहे हे सूचित करते.
जयनगरचा मोवा हा भात व खजूर व पामचा गूळ यापासून केली जाते. दक्षिण २४ परगणा जिल्यात ही मिठाई प्रसिद्ध आहे. नडिया जिल्ह्य़ातील सारपुरिया ही मिठाई प्रसिद्ध असून ती दुधाच्या सायीपासून तयार केली जाते. सीताभोग व मिहिदाना हे दोन वर्धमान जिल्ह्य़ातील पदार्थ असून ते तांदळाचे असतात. माल्दा जिल्ह्य़ात काल मिश्टी मेळा (मिठाई जत्रा) झाली, त्या वेळी ऐकत यांनी सांगितले की, भौगोलिक ओळख असल्याने पदार्थाची नक्कल होत नाही व त्याचा दर्जाही राखला जातो. मिठाई निर्यात करण्याचाही राज्याचा इरादा आहे. उत्पादन वाढवण्यासाठी व दर्जा राखण्यासाठी मिठाई उत्पादनात यंत्रांचा वापर केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. मिठाई उत्पादनास लागणारी यंत्रे या जत्रेत प्रदर्शित करण्यात आली. चण्यापासून बनवलेल्या मिठाईचा टिकण्याचा काळ खीर किंवा नारळाच्या पदार्थापेक्षा कमी असतो, असे अन्न प्रक्रियामंत्री कृष्णेंदु चौधरी यांनी सांगितले. लांगचा, बेलकोबाची चमचम, हुगळीची जलभरा, मुर्शीदाबादची चनाबरा, माल्दाची रस कदंबा या मिठाया या जत्रेत सादर करण्यात आल्या.