IIT Bombay Sahil Wakode Suicide Protest Neha Bora Support : आयआयटी मुंबईतील अभियांत्रिकीतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्यारप्रकरणी आंबेडकरवादी संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी आज आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनात ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांनी पोस्टही केली आहे.
साहिल वाकोडे आत्महत्याप्रकरणी निष्पक्ष चौकशी, कथित जातीय भेदभावाची दखल आणि प्रशासनाची भूमिका निश्चित करण्याच्या मागण्यासाठी आंबेडकरवादी संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी आज चलो आयआयआयटीची हाक दिली. तसंच, साहिल वाकोडेचे वडील रविंद्र वाकोडे यांनी गेल्या १२ दिवसांपासून आझाद मैदान येथे उपोषण केले आहे. त्यांच्या संघर्षाला पाठिंबा देण्याकरता हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला नेहा बोरा यांनीही पाठिंबा दर्शवला.
नेहा बोरा यांचा पाठिंबा
यासंदर्भात नेहा बोरा म्हणाल्या, “आपल्या मुलाच्या संस्थात्मक हत्येप्रकरणी साहिलचे आई-वडील न्यायासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आयआयटी मुंबईमध्येही सहकारी एकजुटीने आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत! तुम्हीही त्यांच्यात सामील व्हा!” असं आवाहन नेहा बोरा यांनी केलं.
साहिल हा आयआयटी बॉम्बेमधील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी (Energy Science and Engineering) विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. परीक्षा गृहात मोबाईल वापरून चॅटजीपीटीद्वारे उत्तरे मिळवल्याचा आरोप साहिलवर ठेवण्यात आला होता. यानंतर परीक्षा गृहातील सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. साहिलच्या वडिलांनी (रविंद्र वाकोडे) प्रा. सूर्यनारायण डुल्ला आणि संचालक प्रा. शिरीष केदारे यांच्यावर जातीभेदाचे आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. साहिलला जातीवरून त्रास देण्यात आल्याचा व त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.न्याय मिळावा यासाठी रविंद्र वाकोडे आणि त्यांच्या पत्नीने आझाद मैदानावर बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलन मांडले आहे.
