अमेरिकेतील उच्च पगाराची बँकिंग नोकरी सोडून जगभर भटकंतीला निघालेल्या एका आयआयटी पदवीधराची प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमुळे यश, करिअर आणि वैयक्तिक समाधान यावर प्रकाश टाकला आहे.
पोस्टनुसार, संबंधित तरुणाने आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर अमेरिकेत स्थायिक होत कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली. वयाच्या ३८व्या वर्षी तो ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’मध्ये संचालक (डायरेक्टर) या उच्च पदावर कार्यरत होता आणि त्याला अत्यंत आकर्षक पगार मिळत होता. मात्र, बाहेरून सर्व काही परिपूर्ण वाटत असले तरी आतून तो समाधानी नव्हता.
“आत्म्याला समाधान मिळत नव्हते”
“मी ३८व्या वर्षी फर्स्ट रिपब्लिक बँकेत डायरेक्टर होतो. पगार स्वप्नवत होता, पण गेली दहा वर्षे मला सतत असे वाटत होते की मी एका चक्रात अडकलो आहे. पदोन्नतीच्या मागे धावत होतो, पण आत्म्याला समाधान मिळत नव्हते. मला आयुष्याची सहज, कलात्मक बाजू अनुभवायची होती, जी कॉर्पोरेट स्प्रेडशीटमध्ये मावू शकत नाही,” असे त्याने सांगितले.
नोकरीचा राजीनामा अन् प्रवास सुरू
शेवटी २०१३ मध्ये त्याने मोठा निर्णय घेत नोकरीचा राजीनामा दिला आणि अत्यंत साधेपणाने जगभर एकट्याने प्रवास सुरू केला. स्वतःचे ४ बीएचके घर विकले. पुढील १८ महिन्यांत त्याने तब्बल ३५ देशांचा प्रवास करत विविध संस्कृतींचा जवळून अनुभव घेतला. या प्रवासाने त्याला स्वतःची नव्याने ओळख करून दिली. “रशियाच्या पर्वतरांगांपासून ते इजिप्तच्या वाळवंटांपर्यंत मी एकटाच भटकलो. कुणीही ओळखीचे नव्हते, आणि याच काळात मला माझी खरी ओळख सापडली,” असे तो म्हणाला.
प्रवासातच थाटला संसार
या प्रवासादरम्यान माँटेनेग्रो येथे त्याची कॅथी नावाच्या ऑस्ट्रियन समाजसेविकेशी भेट झाली. काही मिनिटांच्या संभाषणातून सुरू झालेली ओळख पुढे गाढ नात्यात बदलली. काही दिवसांतच ते एकमेकांच्या खूप जवळ आले आणि अखेर २०१६ मध्ये त्यांनी विवाह केला. आज हे जोडपे त्यांच्या तीन मुलांसह जगभर प्रवास करत आहे. त्यांनी पारंपरिक जीवनशैलीऐवजी साधेपणा, स्वातंत्र्य आणि अनुभवांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्याकडे स्वतःचे घर किंवा गाडी नाही; ते होमस्टेमध्ये राहतात आणि भारतातील गुंतवणुकीतून आपला खर्च भागवतात.
“तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे आहे…”
मुलांच्या शिक्षणासाठी ते एनसीईआरटीच्या पुस्तकांसोबत वेद आणि उपनिषदांचा आधार घेत घरातूनच शिक्षण देतात. “आम्ही आमच्या मुलांना शिकवतो की आयुष्य म्हणजे तुम्ही काय मिळवता हे नाही, तर तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
“एका ४ बीएचके घराच्या बदल्यात मी संपूर्ण जग मिळवले,” असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांच्या या अनोख्या जीवनप्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून, ‘खरे यश म्हणजे नेमके काय?’ यावर नव्याने विचार करण्यास भाग पाडले आहे.
