Health Benefits of Gaumutra : आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कामकोटी गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की “एकदा ते तापानं फणफणत असताना त्यांनी गोमूत्र प्राशन केलं. त्यानंतर ते लगेच बरे झाले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस व द्रमुक पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे की “कामकोटी यांचं वक्तव्य हे हास्यास्पद आहे”. कामकोटी १५ जानेवारी २०२५ रोजी मट्टू पोंगलच्या दिवशी ‘गो संरक्षण शाळे’त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. तिथे ते देशी गायींचे संरक्षण करणे आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याविषयी बोलत होते. त्याचवेळी त्यांनी गोमूत्र पिऊन ताप दूर केल्याची गोष्ट सांगितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामकोटी यांनी गोमूत्रातील अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल व पचन सुधारण्याच्या गुणधर्मांबद्दल सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी गोमूत्राचे कथित औषधी गुणधर्म सांगितले. तसेच ते म्हणाले, “मोठ्या आतड्यांशी संबंधित आजार इरिटेबल बोवेल सिंड्रोमसारख्या समस्यांवर गोमूत्र उपयुक्त आहे”. कामकोटींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस व द्रमुक नेते त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. तर, भाजपा नेत्यांनी कामकोटींच्या वक्तव्याचं कौतुक केलं आहे.

कामकोटींचं वक्तव्य हास्यास्पद : द्रमुक

डीएमके नेते टी. के. एस. एलंगोवन म्हणाले, “कामकोटींचं वक्तव्य हास्यास्पद आहे. देशाची शिक्षणव्यवस्था बिघडवणं हेच केंद्र सरकारचं धोरण असल्याचं पाहायला मिळत आहे”. तर के. रामकृष्णन म्हणाले, “कामकोटी यांनी जे काही दावे केले आहेत त्याबाबतचे पुरावे देखील सादर करायला हवेत, अन्यथा त्यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू”.

कार्ती चिदंबरम यांची टीका

दरम्यान, काँग्रेस नेते कार्ती पी. चिदंबरम यांनी देखील कामकोटी यांच्या वक्तव्याची निंदा केली आहे. ते म्हणाले, “आयआयटी मद्राससारख्या संस्थेच्या संचालकाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं अनुचित आहे”.

डॉक्टरांचं म्हणणं काय?

दरम्यान, डॉक्टर्स असोसिएशन फॉर इक्वेलिटीचे डॉ. जी. आर. रवींद्रनाथ म्हणाले, “गोमूत्र प्राशन केल्याने जिवाणू संक्रमण होऊ शकतं आणि हे एक वैज्ञानिक सत्य आहे”. अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याबद्दल रवींद्रनाथ यांनी केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध नोंदवला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit madras director praises cow urine professed medicinal value karti chidambaram slams asc