Ilhan Omar Brother Marriage Fact Check: अमेरिकेच्या गृह सुरक्षा खात्याचे मंत्री मार्कवेन मुलिन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. आपल्या कथित सख्ख्या भावाला अमेरिकेत आणण्यासाठी इल्हान ओमर यांनी त्याच्याशीच कागदोपत्री विवाह केला होता, असा दावा मुलिन यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. वृत्तसंस्था ‘न्यूजवीक’ने यासंदर्भातील वृत्त दिले असून, या विधानामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान उजव्या विचारसरणीचे राजकीय भाष्यकार बेनी जॉन्सन यांना दिलेल्या मुलाखतीत मुलिन यांनी हा दावा केला. “आपल्या भावाला अमेरिकेत आणण्यासाठी ओमर यांनी त्याच्याशी विवाह केला होता, हे सर्वश्रुत आहे,” असा दावा मुलिन यांनी केला.
न्यूजवीकने दिलेल्या वृत्तानुसार, मुलिन यांनी ओमर कुटुंबीयांचे अमेरिकेतील स्थलांतर संशयास्पद असून त्याची फेरचौकशी व्हायला हवी, असे सांगत या संपूर्ण प्रक्रियेत बेकायदेशीर गोष्टी घडल्या असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले असले, तरी आरोप सिद्ध होतील असा कोणताही कागदोपत्री पुरावा त्यांनी सादर केलेला नाही.
नेमके प्रकरण काय?
हा संपूर्ण वाद २००९ मधील एका विवाहाशी संबंधित आहे. त्या वर्षी इल्हान ओमर यांनी अहमद नूर सईद एल्मी या ब्रिटिश नागरिकाशी कायदेशीर विवाह केला होता. एल्मी हे प्रत्यक्षात ओमर यांचे सख्खे बंधू असून, त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळवून देण्यासाठीच हा बनावट विवाह रचण्यात आल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांकडून सातत्याने केला जातो. २०१७ मध्ये ओमर आणि सईद एल्मी यांचा घटस्फोट झाला. मात्र, आजवर ते दोघे एकमेकांचे भाऊ-बहीण असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही.

२०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि काही उजव्या विचारसरणीच्या गटांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केल्यानंतर हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर गाजला. अनेक वर्षे उलटूनही या दाव्याला दुजोरा देणारा कोणताही ठोस पुरावा सार्वजनिकरीत्या उपलब्ध झालेला नसताना, आता थेट विद्यमान मंत्र्यांनीच हा आरोप केल्यामुळे या प्रकरणाने पुन्हा वेगळे वळण घेतले आहे.
राजकीय सूडबुद्धीचा आरोप फेटाळला
ही चौकशी राजकीय हेतूने प्रेरित आहे का? असा प्रश्न विचारला असता मुलिन यांनी यात तथ्य नसल्याचे म्हटले. “आम्ही एखादे प्रकरण पुढे नेतो, तेव्हा ते राजकीय नसते. संबंधित व्यक्तीने काहीतरी चुकीचे केले असल्यामुळेच ती कारवाई होते,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, गृह सुरक्षा मंत्रालयाने यावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, चालू तपासावर आम्ही भाष्य करत नाही. मात्र काँग्रेसच्या सदस्यांसह कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही,” असेही मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नमूद केले.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काही काळापूर्वी हा दावा केला होता. त्याचा हा व्हिडीओ
इल्हान ओमर यांचे प्रत्युत्तर
खासदार इल्हान ओमर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सदर आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत, महत्त्वाच्या प्रशासकीय मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठीच जुन्या अफवा पुन्हा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘स्टार ट्रिब्यून’ने २०१९ मध्ये ओमर यांचा विवाह आणि घटस्फोटांच्या नोंदींची सखोल तपासणी केली होती. त्यात काही तांत्रिक प्रश्न उपस्थित झाले असले तरी एल्मी हे त्यांचे बंधू असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने केलेल्या स्वतंत्र पडताळणीतही हे दोघे भाऊ-बहीण असल्याचा कोणताही पुरावा आढळला नव्हता.
