Woman SWAT Commando Brutally Killed by Husband: दिल्ली पोलिस दलातील स्वॉट कमांडो काजल चौधरीचे (२७) धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. पतीने अमानुष मारहाण करुन डोक्यात डंबेलने प्रहार करत तिचा जीव घेतला. खून करण्यापूर्वी संशयिताने काजलच्या भावाला फोन करुन, तिची हत्या करत असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे तर काजल जिवाच्या अकांताने विव्हळत होती तेव्हा तिचा भाऊ फोनवरुन बहिणीचे किंचाळणे हतबल होऊन ऐकत होता.
मी तुझ्या बहिणीला मारतोय…
काजल चौधरीचा भाऊ निखिलने २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. निखिल म्हणाला की, त्यादिवाशी रात्री काजलचा पती अंकुरचा फोन आला. ‘तुझ्या बहिणीला समजावून सांग’, असे तो मला सांगत होता. अंकुर संरक्षण खात्यात कारकून म्हणून कार्यरत आहे. तर, निखिल संसद मार्ग येथील पोलिस स्थानकात कॉन्स्टेबल म्हणून काम करतो. निखिलने अंकुरची समजूत काढत त्याला शांत होण्याचा सल्ला दिला.
निखिल पुढे म्हणाला की, “माझा फोन रेकॉर्ड कर, पोलिसांना पुरावा म्हणून दाखविण्यास मदत होईल. मी तुझ्या बहिणीला मारतोय. पोलिस मला काहीच करु शकणार नाहीत. त्यानंतर मला फोनवर काजलचा किंचळण्याचा आवाज ऐकू आला आणि फोन बंद झाला. काजलचा आवाज काळीज चिरणारा होता”, असे निखिल सांगतो.
काही वेळानंतर अंकुरचा पुन्हा फोन आला…
अंकुरचा पुन्हा फोन आल्यानंतर तो म्हणाला, ‘संपवलं तुझ्या बहिणीला, आता हॉस्पिलटलमध्ये ये’. पोलिसांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. अंकुरचे कुटुंबीय तिथेच होते. वैरीदेखील अशा पद्धतीने कोणाला मारणार नाही, अशी तिची भयानक अवस्था झाली होती, असे निखिल म्हणाला.
हुंड्यावरुन त्रास
काजलला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. अंकुरची आई आणि दोन बहिणी यासाठी कजलचा छळ करत होत्या. २०२३ मध्ये लग्न झाल्यापासून वारंवार तिला त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. काजलच्या आईने एका इंग्रजी वृत्तपतत्राला दिलेल्या माहितीनुसार, काजलने कर्ज घेतले होते. या कर्जाचे पैसे अंकुर वापरत होता.
काजलचे वडील राकेश यांनी देखील हुंड्यावरुन मुलीला होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला आहे. लग्नावेळी अंकुरला महागडे गिफ्ट देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अंकुरला लग्नात बुलेट, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम देण्यात आली होती. यानंतर काजलने त्यांना कारही दिली होती. पण, सासरच्यांना तिला त्रास देण्याचे कमी केले नाही. तिला याबाबत कधी स्पष्टपणे बोलताही आले नाही, असे राकेश म्हणाले.
चार महिन्यांची गरोदर काजल
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २२ जानेवारी रात्री १० ते १०.३० दरम्यान दिल्लीतील मोहन गार्डन येथे ही घटना घडली. काजल चार महिन्यांची गरोदर होती. काजलच्या डोक्यात अवजड डंबेलने मारहाण करण्यात आली होती. याशिवाय तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, २७ जानेवारी रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन पती अंकुरला अटक केली आहे.
कॉलेजमधील प्रेम, लग्न ते दुर्दैवी अंत
पानिपत येथे कॉलेजमध्ये असताना दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी लग्न केले. पण, दोघांमध्ये वारंवार खटके उडत. त्यांना दीड वर्षांचा मुलगा देखील असून, अद्याप त्याला याबाबत काही माहिती नसल्याचे काजलच्या आई- वडिलांनी सांगितले. लहान मुलाचा संभाळ तेच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पोलिस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

