कोलकाता येथे ज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत आयएमएने आज संप करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करा, डॉक्टरांना सुरक्षा पुरवा अशा मागण्या प्रामुख्याने करत हा संप पुकारण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजेच २३ तासांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद रहाणार आहेत. ज्याचा फटका सामान्य रूग्णांना बसू शकतो. मार्ड, परिचारिका संघटना या सगळ्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे.

या संपामुळे देशभरातील ३ लाख तर राज्यातील ४० हजारांपेक्षा जास्त खासगी डॉक्टर सेवा देणार नाहीत. आपत्कालीन आणि तातडीच्या सेवा मात्र सुरू असणार आहेत. या संपामुळे शासकीय रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यामधील आरोग्य सेवेवर ताण येण्याची शक्यता आहे.

कोलकाता या ठिकाणी झालेल्या डॉक्टरच्या मारहाणीचा निषेध करत आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने संपाची हाक दिली आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबलेले नाहीत. हल्लेखोरांवर कारवाई केली जावी अशीही मागणी केली जाते आहे तरीही अशा घटना थांबताना दिसत नाहीत त्याचमुळे संप पुकारण्यात आल्याचं IMA ने स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्य रूग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान अनेक रूग्णांनीही डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.