‘आयएमए’चा दावा; आरोग्य मंत्रालयाचा मात्र इन्कार

नवी दिल्ली : करोना विषाणूचा वेगाने होणारा प्रसार आणि खबरदारीच्या उपायांनंतरही वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता भारतात समूह संसर्ग सुरू झाला असल्याचा दावा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) केला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होऊ लागली असून आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा विचार करून समूह संसर्ग नाकारणे अयोग्य ठरेल, असा इशाराही ‘आयएमए’ने दिला आहे.

देशात सलग चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येत ३० हजारांहून अधिक भर पडली असून एकूण बाधितांची संख्या ११ लाखांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयएमए’चा दावा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) पुन्हा एकदा समूह संसर्गाची शक्यता फेटाळली आहे.

देशातील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली असून रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ३८ हजार ९०२ रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचली आहे. हे वृत्त प्रसिद्ध होईतोपर्यंत, सोमवारी हा आकडा ११ लाखांच्या पार पोहोचला असण्याची शक्यता आहे. ‘हे सगळे परिस्थिती बिघडू लागल्याचे द्योतक आहे. प्रतिदिन रुग्णवाढ होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. मात्र, देशाच्या ग्रामीण भागांतही करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. ही बाब अधिक चिंताजनक म्हणावी लागेल,’ असे सांगत ‘आयएमए’च्या भारतीय रुग्णालय मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा यांनी समूह संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांतील ग्रामीण भागांत करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला तर साथरोग नियंत्रणात कसा आणणार, असा सवाल त्यांनी केला. ‘करोनाच्या प्रादुर्भावासंदर्भातील सर्व मुद्दे महत्त्वाचे असून राज्यांनी साथरोग आटोक्यात आणण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी गरजेनुसार केंद्राची मदत घेतली पाहिजे’, असे मोंगा म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) समूह संसर्गाचा दावा फेटाळला आहे. ‘हा केवळ स्थानिक उद्रेक आहे’ असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडय़ातही सांगितले होते. आयसीएमआरने केलेल्या सर्वेक्षणातही छोटय़ा जिल्ह्य़ांमध्ये केवळ एक टक्का लोक करोनाबाधित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.

‘आयएमए’च्या महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनीही, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशाच्या प्रतिमेचा विचार करून समूह संसर्गाची शक्यता नाकारणे अयोग्य आहे’ असे स्पष्ट मत व्यक्त केले. ‘विषाणूचा वेगाने होणारा

प्रसार आणि सर्व प्रकारच्या खबरदारीचे उपाय अवलंबूनसुद्धा नागरिकांना होणारा संसर्ग या दोन बाबी पाहता देशात करोना विषाणूचा समूह संसर्ग आहे, असे म्हणण्यास पुरेपूर वाव आहे,’ असे ते म्हणाले.

‘चाचण्यांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढवणे, चाचणी करण्यासाठी ठरावीक लक्षणांची अट न ठेवणे असे काही बदल तातडीने करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लक्षणेविरहित वाहक, रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे संपूर्ण विलगीकरण हा संसर्ग रोखण्यातील प्रमुख उपाय आहे, याची गांभीर्याने नोंद घेतली जाणे महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले.

६३ टक्के रुग्ण करोनामुक्त : देशातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २३ हजार ६७२ रुग्ण करोनामुक्त झाले असून या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ६ लाख ७७ हजार ४२२ इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ६२.८६ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली. सध्या देशात दहा लाख लोकसंख्येमागे सुमारे दहा हजार चाचण्या केल्या जात आहेत, असेही सांगण्यात आले.

राज्यात ९५१८ रुग्णवाढ : महाराष्ट्रात रविवारी ९५१८ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,१०,४५५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात ११,८५४ बळी गेले असून रविवारी २५८ जणांचा मृत्यू झाला.

मृत्यूचे प्रमाण अडीच टक्क्यांखाली

करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले असून ते पहिल्यांदाच अडीच टक्क्यांपेक्षा खाली आले आहे. राष्ट्रीय सरासरी मृत्यू दर २.४९ टक्के असून २९ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. पाच राज्यांत मृत्यूदर शून्य असून १४ राज्यांत तो एक टक्का इतका आहे. भारतातील करोना मृत्यूचे प्रमाण १२ मे रोजी ३.२ टक्के इतके होते. ते एक जून रोजी २.८२वर घसरले. दहा जुलै रोजी २.७२ टक्के असलेला मृत्यूदर सध्या २.४९ इतका  आहे.