अ‍ॅलोपॅथीविरुद्ध अशास्त्रीय वक्तव्ये करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल आणि शास्त्रीय औषधांची बदनामी केल्याबद्दल योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुद्ध केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कारवाई करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी केली.

अशाप्रकारची ‘अडाणी’ वक्तव्ये देशाच्या सुशिक्षित समाजासाठी, तसेच त्याला बळी पडणाऱ्या गरिबांसाठी धोकादायक आहेत, असे आयएमएने एका निवेदनात म्हटले आहे.

‘अ‍ॅलोपॅथी एक ऐसी स्टुपिड और दिवालिया सायन्स है’, असे बाबा रामदेव म्हणत असलेला एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे, त्याचा आयएमएने हवाला दिला आहे. ‘अ‍ॅलोपॅथीची औषधे घेतल्यानंतर लाखो लोक मरण पावले आहेत’, असेही रामदेव यात म्हणत आहेत. भारताच्या औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली रेमडेसिविर, फॅविफ्लू व इतर औषधे कोविड-१९च्या रुग्णांच्या उपाचारात अपयशी ठरली असल्याचा दावाही रामदेव यांनी यात केला आहे.

‘केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे आधुनिक औषधविज्ञानाचे पदव्युत्तर पदवीधारक असून, त्यांनी या सद्गृहस्थांचे आव्हान स्वीकारून आधुनिक औषध विद्याशाखा बरखास्त करावी, किंवा लाखो लोकांना अशा अशास्त्रीय वक्तव्यांपासून वाचवण्यासाठी साथरोग कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा’, असे आयएमएने म्हटले आहे.