आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीवा जागतिक बँकेच्या अहवालात गैरव्यवहार केल्याच्या वादात अडकली आहे. चीनला खुश करण्यासाठी जागतिक बँकेच्या ‘डुइंग बिझनेस रिपोर्ट’मध्ये बदल केल्याचा आरोप जॉर्जीवावर आहे. क्रिस्टलिना जॉर्जीवा जागतिक बँकेत असताना तिने अहवालात बदल करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. दरम्यान, जॉर्जीवाने तीच्यावरील आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, जागतिक बँकेने हा ‘डुइंग बिझनेस रिपोर्ट’ २०१८ ते २०२० च्या आवृत्त्यांच्या तपासात अनियमितता आढळल्यानंतर त्वरित बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक बँकेच्या या प्रमुख अहवालात देशांना व्यापार नियम आणि आर्थिक सुधारणांच्या आधारावर स्थान देण्यात आले आहे. हा अहवाल दाखवून सरकार गुंतवणूकदारांना येथे गुंतवणूक करण्यास सांगतात. मात्र चीनची या अहवालातील त्यांच्या स्थानाबाबत नाराजी होती. लॉ फर्म विल्मरहेलच्या एका तपास अहवालात असे आढळून आले की बीजिंगने २०१७ मध्ये त्यांच्या ७८ व्या रँकिंगबद्दल तक्रार केली होती आणि पुढील वर्षी या रँकमध्ये त्यांना आणखी खाली दाखवणार होते.

ऑक्टोबर २०१७ मध्ये, अहवाल येण्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यात, जागतिक बँकेचे तत्कालीन अध्यक्ष जिम किम आणि जॉर्जीवा (तत्कालीन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चीनच्या स्कोअर बदलण्यास सांगितले होते. जणेकरून चीनचा स्कोअर अधिक चांगला दाखवता येईल. किमने चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रँकिंगवर चर्चा केली होती, जे रँकिंगवर खूश नव्हते. त्यावेळी रँकिंग कसे सुधारणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

भांडवलासाठी चीनकडून मदत मागितली

त्यावेळी जागतिक बँकेने भांडवलासाठी चीनकडून मदत मागितली होती. त्या बदल्यात अहवालात त्याला हा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची देखील चर्चा आहे. ‘डूइंग बिझनेस १०१८’ अहवालात चीनने ७ स्थानांची झेप घेतली. त्यांच्या रँकिंगमध्ये ही सुधारणा डेटा मेथडॉलॉजीमध्ये बदल केल्यानंतर झाली, जी सुरुवातीच्या मसुद्याच्या अहवालापेक्षा पूर्णपणे वेगळी होती, असा आरोप होत आहे. सध्या या अहवालासंदर्भात जिम किम काहीच बोलले नाहीत.

डेटाच्या तपासात फेरफार झाल्याचे नाकारले

आयएमएफ प्रमुखांनी दिलेल्या निवेदनात डेटाच्या तपासात फेरफार झाल्याचे नाकारले आहे. जागतिक बँकेचा हा अहवाल २०१८ मध्ये त्यांच्या भूमिकेशी संबंधित आहे आणि यामुळे त्याची प्रतिमा खराब होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या दाव्याला देखील हवाला दिला, ज्यामध्ये म्हटले आहे की चीनला बहुपक्षीय संस्थेने मदत केली आहे.