मंगळावर पाठवण्यात आलेल्या नासाच्या मार्स रेकनसान्स ऑरबिटर यानाला तेथील विवरात काचेचे थर सापडले आहेत. मंगळ हा पृथ्वीजवळता लाल रंगाचा ग्रह आहे. जोरदार आघाताच्या उष्णतेमुळे हे काचेचे थर तयार झाले असावेत व त्यामुळे तेथे पूर्वी जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नासाने म्हटले आहे.
नासाच्या मते काचेमुळे प्राचीन काळातील जीवसृष्टीचे अवशेष टिकून राहू शकतात. तेथे काचेचे थर आढळून आल्याने मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नवीन धोरण आखता येईल.
मंगळावर निली फोस नजीक गारग्रेव्हज विवरात काचेचे थर सापडले असून मंगळावरील ६५० कि.मी.चा कमी दाबाचा पट्टा निली फोस नजीक आहे. नासा २०२० मध्ये मार्स रोव्हर यान त्याच भागात उतरवणार असून तेथील माती व खडकांचे नमुने गोळा करणार आहे. निली फोसी हा भाग वैज्ञानिकांनी महत्त्वाचा वाटण्याचे कारण म्हणजे या भागातील कवचाचा भाग फार पूर्वीचा आहे. जेव्हा मंगळावर पाणी होते असे मानले जाते. तेथे जलऔष्णिक गुणधर्मही दिसून आले आहेत. तेथे गरम वाफा बाहेर पडण्याने सजीवांना ऊर्जा मिळत होती असे म्हणतात. गेल्या काही वर्षांत मंगळावर पूर्वी जीवसृष्टी असल्याचे पुरावे संशोधनात मिळाले आहेत. २०१४ मधील एका अभ्यासानुसार ब्राऊन विद्यापीठाचे वैज्ञानिक पीटर शुल्झ यांना अर्जेंटिनात अशाच प्रकारे लाखो वर्षांपूर्वी झालेल्या आघातातून तयार झालेल्या काचेत सेंद्रिय रेणू व वनस्पतींचे भाग सापडले होते. तशीच प्रक्रिया मंगळावर घडलेली असण्याची शक्यता आहे तसे असेल, तर तेथे पूर्वी जीवसृष्टी होती असे मानता येईल.