वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडीकडून महाभियोग प्रस्ताव आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसदेतील कार्यालयात झालेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील उपनेत्या शताब्दी रॉय यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणणे आवश्यक असल्याचे रॉय यांनी बैठकीत सांगितले. हा प्रस्ताव नेमका लोकसभेत मांडायचा का राज्यसभेत मांडायचा याबाबत विरोधक चर्चा करत आहेत. सभागृहात प्रस्ताव मांडण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याचे एका नेत्याने नमूद केले.

प्रक्रिया काय?

राज्यघटनेच्या कलम ३२४ (५) प्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्तांना महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून हटवता येते. दोन्ही सभागृहात उपस्थित आणि मतदान करणार्‍या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताची त्यासाठी आवश्यकता आहे. हा प्रस्ताव कोणत्याही एका सभागृहात मांडता येतो. राज्यसभेत ५० तर लोकसभेत १०० सदस्यांच्या सहीने प्रस्ताव मांडावा लागतो. या संदर्भातली सर्व कारणे स्पष्टपणे या प्रस्तावात नमूद करावी लागतात.