Justice GR Swaminathan : मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.आर.स्वामीनाथन यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी खासदारांनी त्यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दाखल केला आहे. जी.आर. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग आणण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करणाऱ्या विरोधी खासदारांमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचाही समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
न्यायमूर्ती जी.आर.स्वामीनाथन हे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. मदुराई येथील एका वादग्रस्त ठिकाणी दिवा लावण्याबाबत न्यायमूर्ती जी.आर.स्वामीनाथन यांनी एक आदेश दिला होता. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी १ डिसेंबर रोजी दिलेला आदेश हा वाद निर्माण करणारा असल्याचा आरोप द्रमुकने केला होता. २०१७ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचे निर्देश दिले होते. तरी देखील आता हा आदेश देण्यात आल्याचं द्रमुकचं म्हणणं आहे.
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांचा निर्णय काय?
द्रमुकने महाभियोगासाठी प्रस्ताव दाखल केला असला तरी हा मुद्दा न्यायाधीशांच्या पदावरून हटवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो का? याबाबत साशंकता आहे. एखादा निकाल आवडला नाही म्हणून न्यायाधीशांविरुद्ध महाभियोगाची मागणी करता येते का हा प्रश्न आहे.न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी १ डिसेंबर रोजी मदुराई येथील एका वादग्रस्त ठिकाणी ‘तिरुपरनकुंद्रम दीपम’ प्रज्वलित करण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. याच ठिकाणाला लागून ऐतिहासिक दर्गाही आहे.
द्रमुक सरकारने केला होता विरोध
द्रमुक सरकारने या आदेशाला विरोध केल्यामुळे अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा निर्देश पाळला नव्हता. त्यामुळे काही दिवसांनंतर न्यायमूर्तींनी तीव्र अवमान याचिका जारी केली होती. यावेळी त्यांनी याचिकाकर्त्यासह इतर १० जणांना टेकडीवर चढून दीप प्रज्वलन करण्यास सांगितले होते. त्यासाठी त्यांना केंद्रीय औद्योगिक दलाची सुरक्षादेखील पुरवली होती. भाजपाने या निर्णयाला उघडपणे पाठिंबा दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक सरकारची कोंडी झाली होती. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या आदेशाविरोधात मदुराईचे जिल्हाधिकारी व तिरुपरंकुंड्रम येथील सुब्रह्मण्यम स्वामी मंदिराचे कार्यकारी अधिकारी यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवर १२ डिसेंबरला उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती स्वामीनाथन कोण आहेत?
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांचा जन्म १९६८ मध्ये झाला. ते मूळचे तिरुवरूर येथील आहेत. १९९१ मध्ये वकील झाल्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये पुद्दुचेरीमध्ये वकिली सुरू केली. २००४ मध्ये त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठात वकिली सुरू केली. २८ जून २०१७ रोजी त्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर एप्रिल २०१९ मध्ये स्वामीनाथन यांची मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
