डाळींच्या आयातीस बिहार निवडणुकीने विलंब झालेला नाही, असे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री संजीव बल्यान यांनी दिले. ते म्हणाले की, खरिपाचे पीक आल्यानंतर डाळीच्या किमती कमी होतील.

तांदूळ, साखर, डाळी यांच्या किमतींबाबत अ‍ॅसोचेमने जे अहवाल प्रसिद्ध केले आहेत ते योग्य नाहीत कारण त्यांनी प्रत्यक्ष स्थिती बघितलेली नाही. डाळीचे दर किरकोळ बाजारात १८० रुपये किलो असून उत्पादन २०१४-१५ मध्ये २० लाख टनांनी कमी झाले आहे. सरकारने बिहार निवडणुकांमुळे डाळींच्या आयातीला विलंब केला हे खरे नाही. सरकारच्या वतीने प्रयत्नात कुठलीही कसूर केलेली नाही. देश पातळीवर डाळींची कमतरता नाही व डाळींची आयातही केली आहे.
खासगी व्यापाऱ्यांनी डाळींची आयात केली आहे व केंद्र सरकारने काही प्रमाणात परदेशी बाजारपेठेतून डाळीची खरेदी केली आहे. एमएमटीसीने ५ हजार टन तूर डाळ आयात केली असून ती डाळ आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओडिशा व तेलंगण सरकारांनी उचलली आहे.