वृत्तसंस्था, नवी दिल्ली, बीजिंग
भारतातील भाविकांसाठी महत्त्वाची असलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत आणि चीनने घेतला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी दोन दिवसांच्या बीजिंग दौऱ्यावर असून चीनचे परराष्ट्र सचिव सुन वेईडाँग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसृत केलेल्या अधिकृत निवेदनात नमूद सांगण्यात आले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्व लडाखमधून सैन्यमाघारीच्या निर्णयानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांचा सर्वंकषपणे आढावा घेतला गेला असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
परराष्ट्र सचिव मिस्राी यांनी सोमवारी सुन वेईडाँग यांची भेट घेण्यापूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांनी एकमेकांबद्दल संशय आणि परकेपणा बाळगण्याऐवजी परस्पर सामंजस्य आणि सहाय्य असावे, त्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात असे वांग यांनी या भेटीत सुचवले.
पूर्व लडाखमधील लष्करी संघर्षानंतर चिनी कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूक करणे अवघड झाले होते. अनेक लोकप्रिय चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली आणि प्रवासी हवाई वाहतूक बंद करण्यात आली. मात्र, व्यापारी वाहतूक सुरू होती.
एकमेकांना सहकार्य
● कैलास मानसरोवर यात्रा २०२५च्या उन्हाळ्यापासून पुन्हा सुरू करणे
● नवी दिल्ली आणि बीजिंगदरम्यान थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करणे
● पत्रकार आणि विचारवंतांना व्हिसा देणे
● दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या नद्यांसंबंधी माहिती एकमेकांना देणे
● अन्य क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्य करणे
भारत आणि चीनदरम्यानच्या समस्या सोडवण्यासाठी आणि दीर्घकालीन धोरण पारदर्शकतेला चालना देण्यासाठी आर्थिक आणि व्यापारी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. द्विपक्षीय संबंध स्थिर आणि दृढ करण्याच्या दृष्टीने विशिष्ट लोककेंद्रित पावले उचलण्यावर दोन्ही देशांदरम्यान सहमती झाली आहे. – परराष्ट्र मंत्रालय