इस्लामाबाद : भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात खनिज तेल मिळवून इंधन दर कमी केल्याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पुन्हा एकदा कौतुक केले आहे. ‘पाकिस्तानात माझे सरकारही स्वायत्त परराष्ट्र धोरणाद्वारे हेच करण्याचा प्रयत्न करत होते,’ असे इम्रान यांनी नमूद केले.

भारत सरकारने शनिवारी पेट्रोल व डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात अनुक्रमे आठ व सहा रुपयांची मोठी कपात केली. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीना प्रतिवर्षी १२ सििलडरवर प्रत्येकी २०० रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले.  

त्या पार्श्वभूमीवर खान यांनी केलेल्या ‘ट्विट’मध्ये दक्षिण आशिया निर्देशांक अहवाल जोडत नमूद केले आहे, की रशियाकडून सवलतीच्या दरात तेलखरेदी केल्यानंतर भारत सरकारने ही इंधन दरकपात केली आहे.  अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या ‘क्वाड’ गटाचा भारत एक सदस्य आहे. तरीही अमेरिकेच्या दबावाला समर्थपणे तोंड देऊन भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल मिळवून आपल्या नागरिकांना दिलासा दिला.आमचे सरकार स्वायत्त विदेश धोरणाद्वारे पाकिस्तानमध्ये हेच करू पाहात होते.

गेल्या महिन्यात त्यांना पदच्युत करणाऱ्या अविश्वास ठरावाच्यावेळी त्यांनी भारतास ‘आत्मसन्मानाचे उत्तम भान असलेले राष्ट्र’ असे संबोधले होते. अलीकडे एका प्रसंगी त्यांनी  सांगितले होते, की भारत आपल्या नागरिकांच्या हितरक्षणासाठी कणखर परराष्ट्र धोरण अवलंबत आहे.

त्यावर पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ या पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम नवाझ यांनी इम्रान यांना भारत एवढा आवडत असेल, तर त्यांनी खुशाल भारतात जावे, अशी टीका केली होती. 

पाकिस्तानी अर्थव्यवस्था शिरविहिन कोंबडीसारखी’ 

आणखी एका ‘ट्विट’मध्ये इम्रान यांनी नमूद केले आहे, की ‘‘आता पाकिस्तानची अर्थव्यवस्था शिर नसलेल्या कोंबडीसारखी भरकटलेल्या अवस्थेत आहे. आम्ही पाकिस्तानचे हित हे सर्वोच्च मानत होतो. परंतु ‘मीर जाफर’ आणि ‘मीर सादिक’ सारख्या स्थानिकांनी परकीय दबावाला बळी पडून सत्ताबदल घडवला.’’ इतिहासात ‘मीर जाफर’ व ‘मीर सादिक’ या दोघांनी आपल्या मालकाचा विश्वासघात करून ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना मदत केली होती.