पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत आणि आरोग्याबाबत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत एका पाकिस्तानी पत्रकाराने केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयातील (GHQ) उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना इम्रान खान आता जिवंत नसल्याची भीती वाटत असल्याचा दावा या पत्रकाराने केला आहे. या दाव्यानंतर पीटीआय पक्षाने थेट लष्कराला आव्हान देत, खान यांना भेटू दिले नाही तर २० लाखांहून अधिक समर्थक रस्त्यावर उतरतील असा थेट इशारा दिला आहे. यासंबधीचं वृत्त ‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
लष्कराच्या गोटातून मिळालेल्या माहितीचा दावा
अमेरिकास्थित पाकिस्तानी ज्येष्ठ पत्रकार वजाहत सईद खान यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रावळपिंडी येथील पाक लष्कराच्या मुख्यालयातील (GHQ) तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांच्याबाबतीत ही गंभीर शंका व्यक्त केली आहे.
“ही माहिती थेट लष्कराच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे. इम्रान खान आता जिवंत राहिलेले नाहीत, असा अंदाज या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याच कारणामुळे लष्कर आणि लष्करप्रमुख त्यांना कोणालाही भेटू देत नाहीत,” असे वजाहत सईद खान यांनी म्हटले आहे. मात्र, हा दावा अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेला नसून, तो अप्रत्यक्ष सूत्रांच्या माहितीवर आधारित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
२० लाख समर्थक रस्त्यावर उतरणार: पीटीआयचा इशारा
पत्रकाराच्या या दाव्यानंतर इम्रान खान यांच्या कुटुंबाला, वकिलांना आणि पक्षाच्या नेत्यांना अद्याप त्यांच्याशी भेटू दिले गेलेले नाही. यामुळे पीटीआय पक्षाचा आणि समर्थकांचा संताप अनावर झाला आहे. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री आणि पीटीआय नेते सोहेल आफ्रिदी यांनी पाक सरकारला आणि लष्करी राजवटीला तीव्र इशारा दिला आहे.
“आमचे २० लाखांहून अधिक समर्थक रस्त्यावर उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. पाकिस्तानच्या तरुणांमधील हा रोष सध्याच्या लष्करी राजवटीला नियंत्रित करणे अशक्य होईल. जर इम्रान खान यांच्याशी तात्काळ भेटू दिले नाही, तर आम्ही इस्लामाबादच्या दिशेने महामोर्चा काढू.” – सोहेल आफ्रिदी, मुख्यमंत्री, खैबर पख्तुनख्वा प्रांत
अमेरिकेकडून पाकिस्तान सरकारवर दबाव
इम्रान खान यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता केवळ पाकिस्तानपुरता मर्यादित राहिला नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचला आहे. अमेरिकेतील १३ खासदारांच्या एका द्विपक्षीय गटाने परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या अटकेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मानवाधिकार तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार, इम्रान खान यांना दिवसातील तब्बल २३ तास अत्यंत एकांतवासात ठेवले जात आहे. तसेच खान यांच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची दृष्टी ८५ टक्क्यांनी कमकुवत झाल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन खासदारांनी पाकिस्तान सरकारकडे या विषयावर थेट हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
इम्रान खान तुरुंगात का आहेत?
- अल-कादीर ट्रस्ट प्रकरण: ऑगस्ट २०२३ पासून इम्रान खान तुरुंगात असून त्यांना १९० दशलक्ष पौंडांच्या अल-कादीर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा झाली आहे.
- हिंसाचाराचे खटले: ९ मे २०२३ रोजी समर्थकांनी लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांशी संबंधित अनेक गंभीर खटले त्यांच्यावर सुरू आहेत.
- असीम मुनीर यांच्याशी संघर्ष: इम्रान खान आणि पाकचे शक्तिशाली लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. इम्रान यांनी सातत्याने आपल्या अटकेसाठी लष्करालाच जबाबदार धरले आहे.
सध्या इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत पाकिस्तान सरकार किंवा लष्कराकडून कोणताही अधिकृत खुलासा आलेला नाही. मात्र, त्यांना कोणालाही भेटू न देणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणारी टीका आणि पीटीआय समर्थकांचा वाढता आक्रोश यामुळे पाकिस्तानच्या लष्करी राजवटीसमोरील अडचणी कमालीच्या वाढल्या आहेत.
