scorecardresearch

इम्रान खान यांना वाटतेय भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाची भीती; म्हणाले, “मी भारताला इतर कुणापेक्षाची जास्त ओळखतो”!

काश्मीरचा मुद्दा न सुटल्यास भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाची शक्यता? इम्रान खान यांना वाटतेय भिती!

imran khan on india pakistan nuclear war kashmir issue
इम्रान खान यांचं काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त विधान!

गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून संबंध तणावपूर्ण झाले आहेत. अजूनही पाकिस्तानकडून काश्मीरबाबत सातत्याने वादग्रस्त विधानं केली जात असून नुकतंच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक गंभीर विधान केलं आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्धाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, “भारताला मी इतर कुणापेक्षाही जास्त चांगला ओळखतो”, असं इम्रान खान म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंधात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता असून त्यांच्या या विधानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटण्याची देखील शक्यता आहे.

काय म्हणाले इम्रान खान?

पाकिस्तानच्या जिओ टीव्हीला इम्रान खान यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांविषयी वक्तव्य केलं आहे. “जोपर्यंत काश्मीरचा मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्धाची भीती कायम राहणार आहे”, असं विधान इम्रान खान यांनी यावेळी केलं. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी देखील चर्चा केल्याचं इम्रान खान म्हणाले.

“मी पाकिस्तानमध्ये सत्तेत येताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली होती. मी त्यांना म्हणालो होतो की जर तुम्ही एक पाऊल पुढे आलात, तर मी दोन पावलं पुढे येईन”, असं इम्रान खान म्हणाले. भारत आरएसएसच्या विचारसरणीच्या प्रभावाखाली आल्याच्या विधानाची देखील त्यांनी यावेळी पुनरुक्ति केली.

“मी भारताला चांगला ओळखतो!”

दरम्यान, यावेळी मुलाखतीमध्ये बोलताना इम्रान खान यांनी आपण भारताला ओळखत असल्याचं विधान केलं. “माझे भारतात खूप सारे मित्र आहेत. त्यामुळे इतर कुणापेक्षाही मी भारताला चांगला ओळखतो”, असं ते म्हणाले.

“नाक खुपसू नका, जखमी व्हाल”, हिजाब वादावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला असदुद्दीन ओवैसींनी सुनावलं!

तणाव वाढला!

२०१६मध्ये झालेला पठाणकोट हल्ला, त्यापाठोपाठ भारतात पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवाया, २०२०मध्ये झालेला पुलवामा हल्ला, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा भारताचा निर्णय या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Imran khan fears india pakistan nuclear war kashmi issue unresolved pmw

ताज्या बातम्या