scorecardresearch

इम्रान खान सरकार संकटात; संसदेतील २४ सत्ताधारी सदस्यांचे बंड; विरोधात मतदान करण्याचे संकेत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे.

वृत्तसंस्था

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. विरोधी पक्षांनी सरकारविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे, त्यातच इम्रान खान यांच्या तहरिक- ए- इन्साफ या पक्षाच्या २४ संसद सदस्यांनी सरकारविरोधातच बंडाचे निशाण फडकवले आहे. अविश्वास ठरावात सरकारच्या बाजूने मतदान न करण्याचे संकेत या सदस्यांनी दिले असून त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार संकटात सापडले आहे.

पाकिस्तानात आलेल्या आर्थिक संकटाला केंद्र सरकार जबाबदार असून महागाई कमी करण्यासाठी सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत, असा आरोप करून पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांच्या सदस्यांनी संसदेत सरकारविरोधात ८ मार्च रोजी अविश्वास ठराव आणला. त्यावर २८ मार्च रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.

३४२ सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या कायदेमंडळात बहुमत मिळवण्यासाठी १७२ सदस्यांना पाठिंबा असणे आवश्यक आहे. इम्रान खान यांच्या तहरिक- ए- इन्साफ या पक्षाचे १५५ सदस्य असून सरकार स्थापन करताना सहा लहान पक्षांच्या २३ सदस्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र हे पक्षही इम्रान खान यांच्या सरकारवर नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे.  खान यांच्या पक्षाच्या २४ सदस्यांनीही  सरकारला पाठिंबा न देण्याचे संकेत दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Imran khan government crisis rebellion ruling members parliament indications vote ysh

ताज्या बातम्या