scorecardresearch

निवडणुका जाहीर करण्यासाठी इम्रान खान यांची सरकारला ६ दिवसांची मुदत

प्रांतिक विधानसभा बरखास्त करून नव्याने सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यासाठी पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी शहबाझ शरीफ सरकारला सहा दिवसांची अंतिम मुदत दिली.

पीटीआय, इस्लामाबाद : प्रांतिक विधानसभा बरखास्त करून नव्याने सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यासाठी पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी शहबाझ शरीफ सरकारला सहा दिवसांची अंतिम मुदत दिली. ‘‘आयातीत सरकार असे करू शकले नाही, तर मी ‘संपूर्ण देशासह’ पुन्हा राजधानी इस्लामाबादमध्ये येईन’’, असा इशारा त्यांनी दिला.

 आपल्या पक्षाचा मोर्चा रोखण्यासाठी छापे व अटकसत्र यांसारख्या ‘क्लृप्तय़ा’ वापरल्याबद्दल खान यांनी येथील जिन्ना अ‍ॅव्हेन्यू येथे ‘आझादी मार्च’च्या हजारो निदर्शकांना संबोधित करताना सरकारवर सडकून टीका केली. या मुद्दय़ाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले.

 ‘आमचा आझादी मार्च चिरडून टाकण्यासाठी सरकारने प्रत्येक उपायाचा अवलंब केला. त्यांनी शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध अश्रुधूर वापरला, आमच्या घरांवर छापे घालण्यात येऊन आमच्या खासगीपणाचे उल्लंघन करण्यात आले. पण देश स्वत:ला गुलामीच्या भयातून मुक्त करून घेत असल्याचे मी पाहिले’, असे इम्राम म्हणाले.

 ‘प्रांतिक विधानसभा बरखास्त करा आणि सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करा असा माझा या आयातीत सरकारला संदेश आहे. अन्यथा, सहा दिवसांनंतर मी पुन्हा इस्लामाबादला येईन’, असे इम्रान यांनी म्हटल्याचे वृत्त ‘जिओ न्यूज’ ने दिले आहे.  कुठल्या लोकशाहीत शांततामय निदर्शनांना परवानगी दिली जात नाही आणि निदर्शकांना अश्रुधुराचा मारा, पोलिसांचे छापे आणि अटक यांना सामोरे जावे लागते असा प्रश्न विचारतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर ‘प्रचंड जबाबदारी’ आहे, असे वक्तव्य इम्रान खान यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Imran khan government has six days declare elections ysh

ताज्या बातम्या