Imran Khan Health Pakistan Supreme Court: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. खान यांची ढासळलेली प्रकृती विचारात घेता त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी खान यांना रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली होती.
खासगी रुग्णालयात दाखल करण्याची कोर्टाचे आदेश
इम्रान खान यांना पुढील ४८ तासांत शिफा आंतरराष्ट्रीय हॉस्पिटलमध्ये हलविण्यात यावे आणि १६ सप्टेंबरपर्यंत तिथं ठेवावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रवक्ते नईम हैदर पंजुथा यांनी दिली आहे. खान आणि त्यांच्या कुटुंबियांची दर आठवड्याला भेट व्हावी असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इम्रान खान यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी एक वैद्यकीय पथक तयार करण्यात यावे असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
वैद्यकीय पथकाची नेमणूक
वैद्यकीय पथकात पक्षाच्या नेत्यांचे डॉक्टर आणि खान यांच्या बहीण डॉ. उज्मा खान यांचा समावेश करण्यात यावा, असे या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, कोर्टाने इम्रान खान यांचे वैद्यकीय अहवाल मीडिया बरोबर शेअर न करण्याचे आवाहन वकील आणि कुटुंबियांना केले आहे. तसेच, या विषयाचे राजकारण न करण्याचे आवाहन देखील केले आहे. इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत.
इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत चिंता
इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत त्यांचे कुटुंबीय वारंवार शंका उपस्थित करत आहेत. त्यांना उपचाराची गरज असून रुग्णालयात हलविण्यात यावे अशी मागणी करत आहेत. खान यांच्या मुलाने याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तुरुंगात असल्यापासून इम्रान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांनी देखील खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. इम्रान खान यांना विविध शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजकीय नेत्यांनीही उठवला आवाज
पाकिस्तानचे माजी सभापती आरिफ अल्वी आणि पीटीआय पक्षाचे प्रवक्ते जुल्फीकार बुकारी यांनी इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती. इम्रान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. यात पराभव झाल्यानंतर खान यांचे सरकार कोसळले. खान यांच्याविरोधात विविध खटले चालविण्यात आले व दोषी ठरवून तुरुंगात टाकण्यात आले.
