imran khan health update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना डोळ्यांचा गंभीर आजार झाला असून त्यांना योग्य वैद्यकीय उपचार नाकारले जात आहेत, असा दावा त्यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
इम्रान खान हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ऑगस्ट २०२३ पासून पाकिस्तानच्या अदियाला (Adiala) जेलमध्ये बंद आहेत. इम्रान खान यांनी मात्र त्यांना आणि त्यांच्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सध्याचे सरकार आणि लष्कराने रचलेला हा एक कट असल्याचे म्हटले आहे.
पीटीआय कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप
एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मंगळवारी खान यांच्या पाकिस्तानातील पीटीआय या पक्षाने दावा केला की, इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्याला सेंट्रल रेटिनल व्हेन ऑक्लूजन (CRVO) नावाचा आजाराचे निदान झाले आहे. या आजारात रेटिनल रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि जर यावर वेळीच आणि योग्य उपचार झाले नाहीत, तर कायमस्वरूपी गंभीर नुकसान होण्याचा, म्हणजेच रूग्ण दृष्टी कायमची गमावण्याचा धोका असतो.
सरकार आणि तुरूंग प्रशासन हे खान यांना तज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयात शिफ्ट करण्यास परवानगी देत नसल्याची टीका पक्षाने केली आहे.
“तुरूंग प्रशासन आडमुठेपणा दाखवत तुरूंगातच उपचार व्हावेत असा आग्रह धरत आहे, तर उपचार करणाऱ्या स्पेशलिस्ट डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, असे उपचार तुरूंगात शक्य नाही आणि यासाठी ऑपरेशन थिएटर आणि विशेष वैद्यकीय सुविधांची आवश्यकता आहे. या बेजबाबदार वृत्तीमुळे इम्रान खान यांच्या डोळ्यांची दृष्टी आणि त्यांचे एकूणच आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे,” असे पक्षाने म्हटले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या पक्षाने त्यांच्या डोळ्यांच्या आजाराबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर, बुधवारी अदियाला जेलमध्ये सरकारी डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. मात्र पाकिस्तानच्या सरकारने अद्याप इम्रान खान यांच्या आरोग्यासंबंधी अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
“पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) च्या डॉक्टरांच्या एका पथकाने इम्रान खान यांची अदियाला जेलमध्ये वैद्यकीय तपासणी केली,” असे पंजाब सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले. त्याने सांगितले की डॉक्टरांनी त्यांचा रिपोर्ट दाखल केल्यानंतर खान यांचा आजार किंवा इन्फेक्शनबद्दल माहिती सार्वजनिक केली जाईल
७३ वर्षीय इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून तुरूंगात आहेत, सध्या ते रावळपिंडीतील अदियाला जेलमध्ये अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत.

