मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर पार पडलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारच्या एफआरआरओ विभागाने दिले आहेत. या कारवाईनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या कारवाईवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अमेरिकन गायिका मेरी मिलबन आणि इम्रान खान यांच्यातील फरक अधोरेखित करत दिपके यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

“भाजपाच्या बाजूने बोलल्यास सूट, विरोधात बोलल्यास कारवाई?”

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत अभिजीत दिपके यांनी थेट सवाल विचारला:

“अमेरिकन नागरिक असलेली मेरी मिलबन भाजपाच्या बाजूने बिनधास्त बोलू शकते, पण ओसीआय कार्डधारक असलेला इमरान खान भाजपाविरुद्ध किंवा त्यांच्या धोरणांविरुद्ध काहीही बोलू शकत नाही का?”

त्याचसोबत इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांनी बॉलिवूडमधील कलाकारांना एकत्र येण्याचे आवाहन केले. “बॉलिवूड कलाकारांनो, आता तरी तोंड उघडा! दुसऱ्या कोणासाठी नाही, तर कमीत कमी तुमच्या क्षेत्रातील सहकाऱ्यासाठी तरी एकत्र या आणि आवाज उठवा,” असे दिपके यांनी म्हटले.

भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर कारवाई

१० ऑक्टोबर रोजी मुंबईतील मध्यवर्ती भागातील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपी आणि इतर संघटनांनी निदर्शने केली होती. मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले होते.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी एफआरआरओकडे तक्रार दाखल केली होती. इमरान खानकडे अमेरिकन पासपोर्ट आणि ओसीआय कार्ड असतानाही त्याने राजकीय आंदोलनात भाग घेतला, असा आरोप सोमय्या यांनी केला.

या तक्रारीची दखल घेत गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’ आणि एफआरआरओने इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याची नोटीस जारी केली.

मेरी मिलबनचे सीजेपीवर गंभीर आरोप

दुसरीकडे, अमेरिकन गायिका मेरी मिलबन यांनी सीजेपी आणि आंदोलकांवर गंभीर आरोप केले आहेत. सीजेपीला अमेरिकेतील अशा दात्यांकडून निधी मिळतो, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहेत, असा गंभीर आरोप मिलबन यांनी केला.

मिलबन यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “२५ वर्षे देशाची सेवा करणारे आणि सलग तीन वेळा निवडून आलेले पंतप्रधान अशा विघातक शक्तींसमोर झुकणार नाहीत. अशा विदेशी निधीवर चालणाऱ्या संस्थांची एकच पद्धत असते—देशातील तरुणांना भडकवणे आणि अस्थिरता निर्माण करणे. मात्र, भारतातील जनता अशा कारस्थानांना बळी पडणार नाही.”

“मी एक नागरिक म्हणून इथे आलोय” – इम्रान खान

आंदोलनादरम्यान इम्रान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो म्हणाला होता:

“माझ्या कोणत्याही विशेष मागण्या नाहीत. या शहरात राहणारा एक नागरिक म्हणून मी इथे आलो आहे. लोकांच्या फिरण्यावर आणि बोलण्यावर बंधने का आणली जात आहेत? लोकांचा आवाज का दाबला जात आहे? हे समजून घेण्यासाठीच मी या आंदोलनात सहभागी झालो आहे.”

दरम्यान, एफआरआरओच्या नोटीसनंतर अभिनेता इमरान खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.