इम्रान खान यांची शिफारस

इस्लामाबाद : राजकीय संकटग्रस्त पाकिस्तानचे नेते इम्रान खान यांनी सोमवारी माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांची काळजीवाहू पंतप्रधानपदी नेमणूक करण्याची सूचना पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांना केली.

पंतप्रधान इम्रान खान यांनी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेतला, असे माजी माहितीमंत्री आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे ज्येष्ठ नेते फवाद चौधरी यांनी सांगितले.

पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी सोमवारी इम्रान आणि विरोधी पक्षनेते शेहबाज शरीफ यांना, काळजीवाहू पंतप्रधानांच्या नियुक्तीसाठी नावे सुचवण्याबाबत पत्रे पाठवली होती. त्यानंतर माजी सरन्यायाधीश अहमद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

अध्यक्षांच्या पत्राला उत्तर म्हणून, ‘पीटीआय’च्या कार्य समितीच्या मंजुरीनंतर, पंतप्रधान इम्रान यांनी पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश अहमद यांचे नाव काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी सुचवले, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अध्यक्ष अल्वी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, काळजीवाहू पंतप्रधानाची नियुक्ती होईपर्यंत इम्रान खान पंतप्रधानपदी कायम राहतील. 

घटनेने पंतप्रधान आणि मावळत्या संसदेतील विरोधी पक्षनेत्याशी सल्लामसलत करून काळजीवाहू पंतप्रधान नियुक्तीचा अधिकार राष्ट्रपतींना दिला आहे, असे अध्यक्षांच्या सचिवालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. पाकिस्तानी घटनेच्या अनुच्छेद २२४-अ(१) नुसार, देशात निवडणुका घेण्यासाठी काळजीवाहू सरकारची स्थापना केली जाते.

दरम्यान, विरोधी पक्षनेते शेहबाज शरीफ म्हणाले की अध्यक्ष आणि इम्रान यांनी कायदेभंग केला आहे. काळजीवाहू पंतप्रधान नियुक्तीची प्रक्रिया बेकायदा असल्याने मी त्यात भाग घेणार नाही.

नियोजित काळजीवाहू पंतप्रधानांबद्दल..

– पनामा पेपर्सप्रकरणी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र ठरवणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात न्यायमूर्ती अहमद यांचा समावेश होता. सरकार आणि नोकरशहा यांच्या विरोधातील कठोर निर्णय त्यांनी दिले.

– वायव्य पाकिस्तानात जमावाने तोडफोड केलेल्या मंदिराची पुनर्बाधणी करण्याचे आदेश देण्याबरोबरच ज्यांच्या कृत्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी झाली त्यांच्याकडून जीर्णोद्धाराचा खर्च वसूल करण्याचे निर्देश न्यायमूर्ती अहमद यांनी दिले होते.

– गेल्यावर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी आणि अल्पसंख्य हिंदू समुदायाशी एकोपा व्यक्त करण्यासाठी पुनर्बाधणी केलेल्या मंदिरातील एका भव्य समारंभातही न्यायमूर्ती अहमद यांनी भाग घेतला होता.