Imran Khan Prison Health Rumors Pakistan: माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या अफवांमुळे पाकिस्तानच्या आदियाला तुरुंगाबाहेर काल मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता तुरुंग प्रशासनाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तब्येत उत्तम असल्याचे सांगत ते तुरुंगातच असल्याची माहिती दिली.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे की, इम्रान यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवा निराधार आहेत आणि त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत मिळत आहे.
“इम्रान खान यांना आदियाला तुरुंगातून कुठेही हलवण्यात आलेले नाही. त्यांच्याबाबतच्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. ते पूर्णपणे निरोगी आहेत”, असे तुरुंग प्रशासनाने निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या आरोपाखाली गेल्या दोन वर्षांहून अधिक काळपासून तुरुंगात आहेत. माजी पंतप्रधानांना अमानवीय परिस्थितीत एकांतवासात ठेवण्यात येत असल्याचा दावा इम्रान खान यांच्या बहिणी आणि त्यांच्या मुलांनी केला आहे.
काल आदियाला तुरुंगाबाहेर झालेल्या आंदोलनामध्ये आघाडीवर असलेल्या इम्रान यांच्या बहिणी, नूरीन खान (नियाझी), अलिमा खान आणि उज्मा खान यांनी दावा केला आहे की, न्यायालयाचा आदेश असूनही त्यांना इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या कुटुंबियांना आठवड्यातून दोनदा भेट घेण्याची परवानगी दिली आहे.
बुधवारी पीटीआयचे कार्यकर्ते आणि इम्रान खान यांच्या बहिणींनी आदियाला तुरुंगाबाहेर आंदोलन केल्यानंतर गोंधळ उडाला होता. काही वेळातच पीटीआयचे हजारो कार्यकर्ते दाखल झाले आणि हिंसक आंदोलन केले. यावेळी त्यांनी आदियाला तुरुंगात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
पण, तुरुंग अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी अलिमा खान यांना इम्रान खान यांच्याशी भेटीची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले गेले, असे एआरवाय न्यूजने वृत्त दिले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, इम्रान यांना पूर्वी तुरुंगात जेवढ्या सुविधा मिळत नव्हत्या त्यापेक्षा जास्त सुविधा पुरवल्या जात आहेत.
