Noreen Niazi summons Operation Sindoor: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण, नोरीन नियाझी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना पाकिस्तानी सायबर गुन्हे विभागाने समन्स बजावले आहे. दोन्ही देशांमध्ये झालेला संघर्ष लष्कराची प्रतिमा उंचावण्यासाठी घडवून आणण्यात आला होता, पाकिस्तानचे लष्करी नेतृत्व आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संगनमतातून हा संघर्ष झाला, असा दावा नियाझी यांनी एका मुलाखतीत केला आहे. नोरीन नियाझी यांचा याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नोरीन नियाझी यांना समन्स

“मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला संघर्ष पाकिस्तानच्या लष्कराची प्रतिमा उंचावण्यासाठी घडवून आणण्यात आला होता. अन्यथा मोदींनी दोन मिनिटांत यांना फिक्स केले असते”, असे नोरीन नियाझी व्हायरल व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. पाकिस्तानी सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेने नियाझी यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत त्यांना समन्स बजावले आहे. खोटे, आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी सायबर विभागाने त्यांना समन्स बजावले आहे, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

सायबर विभागापुढे हजर राहण्याचे आदेश

नोरीन नियाझी सोमवारी इस्लामाबाद येथील कार्यालयात हजर राहावे असे समन्स सायबर विभागाने त्यांना बजावले होते. सायबर विभागात हजर न झाल्यास तुमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही असे गृहीत धरले जाईल असा इशारा विभागाने दिल्याचे पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्यून या दैनिकातील वृत्तात म्हटले आहे.

काय म्हणाल्या नियाझी?

“तुम्हाला काय वाटतं? भारत एवढा मोठा देश आहे, त्याच्याकडे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची क्षमता नव्हती? पण, भारताने जाणिवपूर्वक हल्ला करण्यास टाळले यामागे काही सामंजस्य होते”, असे नियाझी म्हणाल्या. “पाकिस्तानला अब्राहम करारात आणणे हा या लष्करी कारवाईचा उद्देश होता”, असे नियाझी मुलाखतीत म्हणत आहेत. “इस्रायला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न होता पण, मध्येच इराणचे युद्ध सुरु झाले, दुबईत झाले आणि आता पाकिस्तानची वेळ होती. ट्रम्प यांचे कौतुक का करत होते? तुम्हाला काय वाटतं त्यांना हे आवडतात?”, असे नियाझी पुढे म्हणत आहेत.

अब्राहम कराराचा उल्लेख

“इस्रायला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न होता, यासाठी भेटीगाठी देखील सुरु होत्या. यांनी हा संघर्ष घडवून आणला पाकिस्तानी लष्कराला मान मिळवून देण्यासाठी, भारत स्वत: सुपर पॉवर होत आहे, ते रशियाच्या बरोबर गेले”, असे नियाझींनी व्हिडीओत म्हटले आहे. नियाझी पुढे हे माझं स्वत:चं आकलन असल्याचेही व्हिडीओत म्हणत आहेत.