पाकिस्तानमधील अजब निवडणूक, ३३ जागांवर एकटे इम्रान खान लढणार, पक्षाने सर्व जागांवर दिला एकच उमेदवार | Imran Khan to contest all 33 parliamentary seats in upcoming Pakistan bypolls | Loksatta

निवडणूक ३३ जागांवर, मात्र सर्व ठिकाणी पक्षाने दिला एकच उमेदवार, वाचा पाकिस्तानमधील या अजब निवडणुकीबद्दल…

पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झालेले इम्रान खान मार्च महिन्यात देशात होणाऱ्या पोटनिवडुकीत सर्व ३३ जागांवर निवडणूक लढणार आहेत.

Imran Khan Pakistan Bypolls
पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झालेले इम्रान खान मार्च महिन्यात देशात होणाऱ्या पोटनिवडुकीत सर्व ३३ जागांवर निवडणूक लढणार आहेत. (PC : reuters)

पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झालेले इम्रान खान मार्च महिन्यात देशात होणाऱ्या पोटनिवडुकीत सर्व ३३ जागांवर निवडणूक लढणार आहेत. ३३ मतदार संघात इम्रान खान हे एकटेच उमेदवार असणार आहेत. त्यांच्या पक्षाने याबाबतची घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी रविवारी सायंकाळी लाहोर येथे एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, हा निर्णय पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कुरैशी म्हणाले की, इम्रान खान सर्व ३३ संसदीय मतदार संघांमध्ये पीटीआय पक्षाचे एकमेव उमेदवार असतील.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी घोषणा केली होती की, १६ मार्च रोजी नॅशनल असेंबलीच्या ३३ जागांवर पोटनिवडणूक होईल. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अविश्वास ठरावानंतर पाकिस्तानमध्ये सत्तांतर झालं आणि इम्रान खान यांना पंतप्रधानपद गमवावं लागलं. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी पाकिस्तानी संसदेचं कनिष्ठ सभागृह सोडलं होतं. परंतु अध्यक्ष (स्पीकर) राजा परवेज अश्रफ यांनी खासदारांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. खासदार त्यांच्या स्वत:च्या इच्छेने राजीनामा देत आहेत की कोणाच्या दबावाखाली असं करत आहेत याची वैयक्तिक पडताळणी करणे आवश्यक असल्याचे अश्रफ म्हणाले होते.

हे ही वाचा >> पेशावरमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीत भीषण स्फोट, ९० जण जखमी

गेल्या वर्षी इम्रान खान यांनी ८ पैकी ६ जागा जिंकल्या होत्या

एप्रिल २०२२ मध्ये इम्रान खान यांना राजीनामा द्यावा लागला आणि शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनले. गेल्या महिन्यात अध्यक्षांनी पीटीआयच्या ३५ खासदारांचे राजीनामे स्वीकारले. त्यानंतर ईसीपीने त्यांना डी-नोटिफाय केलं होतं. ईसीपीने अद्याप ४३ पीटीआय खासदारांना डी-नोटिफाय केलेलं नाही. उर्वरित ४३ खासदारांना देखील ईसीपीने डी-नोटिफाय केलं तर खान यांच्या पक्षाचं अस्तित्व पुसलं जाईल. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लोकसभेच्या अध्यक्षांनी पीटीआयच्या ११ खासदारांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर इम्रान खान यांनी ८ संसदीय मतदार संघांमध्ये निवडणूक लढवली होती, ज्यापैकी ६ जागा त्यांनी जिंकल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 17:31 IST
Next Story
“महिला बॉसशी लैंगिक संबंध ठेवायला… “, गुगलच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा