पाकिस्तानच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये आज पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्ष पीएमएल-एन आणि पीपीपी यांनी इम्रान खान यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून, इम्रान खान यांनी संसदेत बहुमत गमावले आहे आणि त्यांना तत्काळ राजीनामा द्यावा लागेल, असं म्हटलं आहे.

अविश्वास ठरावावर मतदानापूर्वी इम्रान सरकार कृतीत उतरले आहे. पंजाब प्रांताचे राज्यपाल चौधरी मुहम्मद सरवर यांना सरकारने त्यांच्या पदावरून हटवले आहे. पंजाबच्या नवीन राज्यपालाची घोषणा नंतर केली जाईल. आता तिथल्या घटनेनुसार डेप्युटी स्पीकर हे कार्यवाहक राज्यपाल असणार आहेत.

तर, इस्लामाबादमधील नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षांचे नेते पोहोचू लागले आहेत. त्याचवेळी, अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, इम्रान खान यांच्याविरोधात मतदान करण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. तर, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांच्याविरोधातही विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

पंतप्रधान इम्रान खान आज नॅशनल असेंबलीमध्ये अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्यास तयार आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने इस्लामाबादमध्ये कलम १४४ लागू केले आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने ट्वीट केले आहे की, “पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रत्येक वेळी पाकिस्तानाच अभिमान वाढवला आहे. आज संपूर्ण देश इम्रान खानच्या पाठीशी उभा आहे.”

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावावरील सभागृहाचे कामकाज १२ वाजेपासून सुरू होईल. दरम्यान, विरोधी पक्षाचे खासदारही सभागृहात पोहोचले आहेत. पीपीपीचे नेते आसिफ अली झरदारी आणि बिलावल भुट्टो नॅशनल असेंब्लीत पोहोचले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केली जाऊ शकते, असं पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. ”मला वाटतं की ते इम्रान खान यांना अटक करतील, ते इम्रान खान यांना आणखी सहन करणार नाहीत. १५० सदस्य राजीनामा देऊ शकतात, लोकशाहीला गंभीर धोका आहे. या परिस्थितीवर एकमेव उपाय म्हणजे निवडणुका हा आहे.” असं रशीद म्हणाले आहेत.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीत सहभागी झाल्यानंतर नॅशनल असेंब्लीमध्ये पोहोचले आहेत.

पीएमएलएन नेत्या मरियम औरंगजेब यांनी आकडेवारी सादर करत दावा केला आहे की, विरोधकांकडे 174 खासदारांचा पाठिंबा आहे.
PML-N: 84 , PPP-56, MMA-14, ANP-1, BNP-4, MQM-6, BAP-4, JWP-1,IND-4

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अविश्वास ठरावापूर्वी शांततेचे आवाहन केले आहे. त्यांनी लोकांना हिंसाचारापासून दूर राहण्यास सांगितले. याशिवयाय पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली बाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

उमर सरफराज चीमा यांची पाकिस्तानमधील पंजाबचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी आज पंजाबचे राज्यपाल चौधरी मोहम्मद सरवर यांना पाकिस्तान सरकारने त्यांच्या पदावरून हटवले.

इम्रान खान हे आज नॅशनल असेंब्लीत पोहोचणार नसल्याचे बोलले जात आहे. इम्रान खान अविश्वास प्रस्तावाच्या कार्यवाहीपासून दूर राहू शकतात. असं पाकिस्तानी माध्यामांद्वारे सांगितलं जात आहे.

आतापर्यंत पीटीआयचे केवळ २२ खासदार पाकिस्तानच्या संसदेत पोहोचले आहेत. तर पक्षाने १४२ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचे १७६ खासदार संसदेत पोहोचले आहेत. थोड्याच वेळात नॅशनल असेंब्लीचे दरवाजे बंद केले जातील, त्यानंतर कोणालाही आत जाऊ दिले जाणार नाही.

पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी परदेशी षडयंत्र असल्याचा आरोप करत यांनी अविश्वास ठराव फेटाळला आणि सभागृहात मतदान होऊ दिले नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. संसदेची पुढील बैठक २५ एप्रिल रोजी होणार आहे.