सूर्यावर २०१२ मध्ये झालेल्या चुंबकीय वादळाच्या तडाख्यातून पृथ्वी थोडक्यात बचावली. हे वादळ सेकंदाला ३००० किलोमीटर वेगाचे होते. एक मिनिटात पृथ्वीला पाच वेळा प्रदक्षिणा पूर्ण करण्याची त्याची क्षमता होती. असे वादळ गेल्या १५० वर्षांत झाले नव्हते. त्या वेळी काही अब्ज हायड्रोजन बॉम्बइतकी ऊर्जा त्यातून बाहेर पडली, पण त्या वेळी पृथ्वी सूर्याच्या ज्या बाजूला हे वादळ झाले त्याच्या विरूद्ध बाजूला असल्याने वाचली. अन्यथा, या चुंबकीय वादळामुळे पृथ्वीवरील जीपीएस प्रणाली, उपग्रह संदेशवहन व संपूर्ण इलेक्ट्रॉनिक व्यवस्थाच धोक्यात आली असती, असे सांगण्यात आले.
त्यामुळे पृथ्वीवरील वीजवाहिन्यांचे जाळेही उद्ध्वस्त झाले असते. त्याला आगी लागल्या असत्या. सूर्यावरील चुंबकीय वादळात त्याच्या प्रभामंडलातून अवकाशात चुंबकीय प्लाझ्मा सोडला जातो. या वादळातून पृथ्वी काही मिनिटांच्या फरकाने वाचल्याचे सांगण्यात येते. १८५९ मध्ये पृथ्वीला चुंबकीय वादळाने फटका दिला होता. बर्कले येथील कॅ लिफोर्निया विद्यापीठ व चिनी संशोधकांनी पृथ्वी २३ जुलै २०१२ रोजी चुंबकीय वादळाच्या तडाख्यातून वाचल्याचा निर्वाळा दिला. नासाच्या सोलर टेरेस्ट्रियल ऑब्झव्‍‌र्हेटरी या अवकाशयानानेही या चुंबकीय वादळाचे निरीक्षण केले होते.
चीनच्या अवकाश हवामान वेधशाळेचे यिंग डी लियू व कॅ लिफोर्निया विद्यापीठातील वैज्ञानिक जॅनेट जी. ल्युहमान यांनी सांगितले की, जर या चुंबकीय वादळाने तडाखा दिला असता तर तो मोठा हादरा ठरला असता व त्यामुळे जगात २.६ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले असते.