अनेक देशांमध्ये मोठमोठी संकटं आहेत. कुठे अन्नाचा प्रश्न आहे. कुठे महागाई वाढली आहे. अशा सगळ्या संकटातही आपला देश जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. जी २० समुदायाचं अध्यक्षपद आपल्याला मिळालं आहे ही देखील आपल्या देशासाठी गौरवाची गोष्ट आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्याला सांगू इच्छितो काही लोक असे आहेत ज्यांना याचंही दुःख झालं आहे. ज्यांना दुःख झालं आहे ते १४० भारतवासी नाहीत. हे ते लोक आहेत ज्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराच्या भाषणात हे वक्तव्य केलं आहे.
भारतात आज स्थिर सरकार
आज भारतात एक स्थिर सरकार आहे. अनेक वर्षांनी भारतात राजकीय गोंधळ नाही. राष्ट्रहिताचे निर्णय घेणारं आपलं हे सरकार आहे. आपल्या देशातले बदल हे सक्तीने होत नाहीत. तर काळाची गरज आहे म्हणून होत आहेत.
करोना काळात भारताची अभिमानास्पद कामगिरी
करोना काळात मेड इन इंडिया लस तयार झाली. भारताने जगातलं सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. आपल्या देशाने १५० पेक्षा जास्त देशांना आपण औषधं पोहचवली, लस पोहचवली. भारतातले अनेक देश असे आहेत ज्यांना भारताविषयी कृतज्ञता वाटते. करोना काळात भारताने अभिमानास्पद कामगिरी केली. एक काळ असा होता जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी भारतात वाट बघावी लागायची आज टेक्नॉलॉजीच्याबाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अनेकांना मी काय म्हणतो आहे ते समजण्यास थोडा वेळ लागेल असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला.
देश समृद्ध होत असतानाही काही लोक निराशेच्या गर्तेत
आज भारताच्या समृद्धीमध्ये जग आपली समृद्धी पाहतं आहे. निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक आपल्या देशाची प्रगती पाहूच शकत नाहीत सहन करू शकत नाहीत. भारताच्या १४० कोटी लोकांच्या शक्तीमुळेच आज देशाचा डंका जगभरात वाचतो आहे. गेल्या ९ वर्षात ९० हजार स्टार्ट अप्स सुरू झाले आहेत. स्टार्ट अप विश्वात आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. आज भारत जगभरात मोबाइलच्या निर्मितीतला दुसरा देश आहे. डोमेस्टिक विमान प्रवासाच्या बाबतीत आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत या सगळ्या बाबी आपल्यासाठी अभिमानास्पद आहेत यात माझ्या मनात काहीही शंका नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशातल्या प्रत्येक क्षेत्रात मला आशा आणि स्वप्नं दिसत आहेत. आपली स्वप्नं आणि संकल्प घेऊन लोक पुढे जातो आहे. मात्र लोकसभेत काही लोक खूप निराशेत बुडून गेले आहेत. ही निराशा अशीच आलेली नाही. यामागे एक कारण आहे. जनतेने आम्हाला इथे बसवलं आहे एकदा नाही दोनदा बसवलं आहे.
२००४ ते २०१४ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं होतं. आता याच लोकांना मळमळ होते आहे, निराशा होते आहे. ज्यांनी बेरोजगारी दूर करण्याची वचनं दिली होती ते काहीही करू शकले नाहीत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.