बिहारमध्ये चाललंय काय? असा प्रश्नच पडतो आहे. याचं कारण म्हणजे जमुई या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा छळ आणि विनयभंग केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता समस्तीपूर जिल्ह्यातली घटना समोर आली आहे. समस्तीपूरची ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अल्पवयीन मुलासह आलेल्या एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग एका टोळक्याने केल्याचा हा व्हिडीओ आहे. ही घटना १५ सप्टेंबरची आहे असं सांगितलं जातं. समस्तीपूर जिल्ह्यातील कर्पूरी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातली ही घटना आहे. एक अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलगी दोघंही बाईकवरून चालले होते. चार जणांच्या टोळक्याने या दोघांना घेराव घातला. त्यानंतर यातल्या दोघांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
नेमकी काय घटना घडली?
समोर आलेल्या माहितीनुसार जगतसिंहपूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी दोघंही बाईकने या ठिकाणी असलेल्या पूलावर पोहचले. तिथे दोघंही बोलत होते. त्यावेळी काही तरूण तिथे आले होते. त्यावेळी या अल्पवयीन मुलाला आणि मुलीला आधी मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर मुलगा तिथून पळून गेला. यानंतर अल्पवयीन मुलीची छेडछाड सुरू झाली आणि तिचा विनयभंग करण्यात आला. Ndtv ने हे वृत्त दिलं आहे.
व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?
व्हायरल व्हिडीओत जी दृश्यं दिसत आहेत त्यानुसार ती मुलगी सातत्याने या तरूणांचा विरोध दर्शवते आहे. पण ते युवक तिचं अजिबात ऐकत नाहीत. सातत्याने तिची छेड काढली जाते आहे. असाही आरोप करण्यात येतो आहे की हे तरूण सातत्याने तिला तिचा पत्ता विचारत होते. तसंच जो मुलगा माझ्यासह आला होता तो माझा भाऊ होता असं सांगितल्यानंतर तिला या तरूणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच जमुई या ठिकाणचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता समस्तीपूरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे?
पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. राहुल कुमार पासवान (वय-१९) त्याचे वडील अरूण पासवान, अवधेश पासवान, नेवालाल पासवान, विकास शर्मा अशा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना एका व्यक्तीने त्याच्या मोबाइल कॅमेरात चित्रीत केली. त्यानंतर हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केला. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तसंच पोलीस ठाण्यात या चार जणांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की आम्ही दोषींना सोडणार नाही.
