अयोध्या जमीन वादाच्या खटल्यात दाखल करण्यात आलेल्या सर्व फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे राम मंदिर बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नऊ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या जमीन वादाच्या खटल्यात निकाल दिला. या निकालाविरोधात या सर्व फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

मुख्य न्यायमूर्ती एस.ए.बोबडे, न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड, अशोक भूषण, ए अब्दुल नझीर आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या सर्व याचिका मेरीट नसल्यामुळे फेटाळून लावल्या. अयोध्या खटल्यात नऊ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालावर पूनर्विचार करण्यात यावा यासाठी १८ फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे वादग्रस्त जागेवर राममंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला तसेच अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते.

“सर्वोच्च न्यायालयाने आमच्या फेरविचार याचिका फेटाळून लावल्या हे आमचे दुर्देव आहे. आमचे पुढचे पाऊल काय असेल याबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही. आम्ही आमचे वरिष्ठ वकिल राजीव धवन यांच्याबरोबर चर्चा करु” असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या जाफरयाब जिलानी यांनी सांगितले.

“सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे आम्ही दु:खी आहोत. बाबरी मशीद पाडली आणि ज्यांनी हे कृत केले ते गुन्हेगार असल्याचे कोर्टाने मान्य केले. पण न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला” अशी भावना जमीयत उलेमा-ए-हिंदचे अर्शद मदनी यांनी व्यक्त केली.