मध्य आशियात सुरु असलेल्या तणावाचा परिणाम इंधनावर झाला आहे. एलपीजी सिलिंडर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान दिल्लीत काळ्या बाजारात गॅस सिलिंडरची किंमत ६ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे. तर सिलिंडर रिफिल करण्यासाठी ४ हजार रुपये घेतले जात आहेत. एलपीजीचा मुद्दा लोकसभेत राहुल गांधी यांनीही उपस्थित केला होता. तर विरोधकांनी या मुद्द्यावर गदारोळही केला होता. दरम्यान एलपीजीचा तुटवडा नाही हे सरकारकडून सांगण्यात येतं आहे. दरम्यान दिल्लीत सिलिंडरचा काळा बाजार होत असल्याची बाब समोर आली आहे.

एलपीजी सिलिंडर्सबाबत काय माहिती समोर आली आहे?

दिल्लीत सिलिंडरच्या काळ्या बाजारात एलपीजी सिलिंडरसाठी ६ हजार ५०० रुपये आकारले जात आहेत.

दिल्लीत सिलिंडर रिफिल करुन देण्यासाठी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये आकारले जात आहेत.

दिल्लीत १४ किलोचा सिलिंडर ९०० ते १ हजार रुपयांना मिळतो पण आता तुटवडा जाणवू लागल्याने काळा बाजार वाढला आहे.

एलपीजी सिलिंडरचा अशा पद्धतीने काळा बाजार करणं, भरमसाठ शुल्क आकारणं बेकायदेशीर आहे. मात्र तरीही या गोष्टी राजधानीत होत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

काळा बाजार करणाऱ्या व्यक्तीने काय सांगितलं?

तुम्ही पोलिसांपासून कसे काय वाचता? हे विचारलं गेलं तेव्हा आम्ही शांतपणे आणि लपतछपत या गोष्टी करतो असं काळा बाजार करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलंं. शिवाय हे सिलिंडर्स आम्ही फक्त ज्यांना ओळखतो त्यांनाच देतो. कुठल्याही अनोळखी माणसांना आम्ही आमच्याकडे स्टॉक नाही असंच सांगतो. रेड पडण्याची भीती असते. त्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं. जे लोक आम्हाला ओळखतात आणि आम्ही ज्यांची खात्री घेऊ शकतो अशाच लोकांना आम्ही सिलिंडर देतो किंवा रिफिल करुन देतो.

LPG बाबत सरकारचं म्हणणं काय आहे?

व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरचं वितरण २९ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत सुरु करण्यात आलं आहे. तसंच काळा बाजार रोखण्यासाठी आम्ही छापेमारीही सुरु केली आहे. सरप्राईज व्हिजिट्सही सुरु केल्या आहेत. काळा बाजार होत असल्याने स्वयंपकांच्या गॅस वितरणावरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. जे रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. दरम्यान दिल्लीत काही भागांमध्ये सिलिंडरचा काळा बाजार होतो आहे. सिलिंडरची किंमत काळाच्या बाजारात ६ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.