कॅनडातील हॅलिफॅक्स येथे भारतीय वंशाच्या शीख तरुणीचा मृतदेह वॉलमार्टमधील वॉक इन ओव्हनमध्ये आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद कॅनडा तसेच भारतातील सोशल मीडियावर उमटले आहेत. गुरसिमरन कौर असे मृत्यू झालेल्या १९ वर्षीय तरुणीचे नाव आहे. गुरसिमरन व तिची आई वॉलमार्टमध्ये मागील दोन वर्षांपासून काम करत होत्या. संध्याकाळी वॉलमार्टमधील काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी गुरसिमरनची आई तिचा शोध घेत होती. त्यावेळी ही धक्कादायक घटना निदर्शनास आली.
तीन वर्षांपूर्वी गुरसिमरन ही तिच्या आईसह युकेमधून कॅनडात स्थलांतरित झाली होती. त्यानंतर दोघी मायलेकींनी आपल्या उदरनिर्वाहासाठी हॅलिफॅक्स येथील वॉलमार्ट मॉलमध्ये नोकरी स्वीकारली. मागील दोन वर्षांपासून त्या दोघी वॉलमार्टमध्ये नोकरी करत होत्या. शनिवारी संध्याकाळी वॉलमार्टमधील काम आटोपल्यानंतर आईने घरी जाण्यासाठी मुलगी गुरसिमरनचा शोध घेणे सुरू केले. परंतु, गुरसिमरन कुठेच दिसून आली नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या आईने इतर सहकाऱ्यांना गुरसिमरनबाबत विचारणा केली. त्यावर “ती मॉलमध्येच कामात व्यस्त असेल”, असे उत्तर त्यांना मिळाले. तिचा मोबाईल देखील नॉट रिचेबल दर्शवत होता. अखेर तासभर शोध घेतल्यानंतर वॉलमार्टमधील वॉक इन ओव्हनमध्ये (मोठ्या ओव्हनमध्ये) गुरसिमरनचा मृतदेह भाजलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी हॅलिफॅक्स रिजनल पोलीस (HRP) अधिक तपास करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
हेही वाचा : Son Kills Mother: वीस हजारांसाठी जन्मदात्या माऊलीचा खून; मित्रांनी आईचे हात धरले, मुलानं वीट घेतली आणि…
गुरसिमरन कौरचे वडील व भाऊ हे दोघे भारतात राहतात. गुरसिमरन व तिच्या आईने भारतात लवकर परतावे यासाठी दोघेजण प्रयत्न करत होते. मरिटाईम सीख सोसायटी (Maritime Sikh Society) या संस्थेकडून विदेशात मृत्यू झालेल्या भारतीयांना स्वदेशी परत आणण्यासाठी तसेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी निधी गोळा केला जातो. गुरसिमरनच्या मृत्यूनंतर तिच्या मदतीसाठी दहा तासांतच १,८८,९७५ डॉलर निधी जमा झाला आहे. दरम्यान, गुरसिमरनचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात याबाबत अद्याप पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर पोस्ट करताना अफवा पसरवू नका, असे आवाहन हॅलिफॅक्स रिजनल पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच या घटनेनंतर वॉलमार्ट बंद ठेवण्यात आलं आहे.