Chhattisgarh : घटस्फोटित पती आणि प्रियकराने मिळून एका २८ वर्षी महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १९ जुलै रोजी छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. महिलेचा घटस्फोटित पती लुकेश साहू (२९) आणि प्रियकर राजाराम साहू अशी या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे महिलेची हत्या करण्यापूर्वी दोघांनी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लागावी आणि पुरावे नष्ट कसे करावे, यासाठी दृष्यम चित्रपट बघितल्याचं पुढे आलं आहे.

एनडीटीव्हीने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तीन वर्षांपूर्वी मृतक महिलेचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ती माहेरी राहत होती. तीन मुलं असल्याने तिला दर महिन्याला पोटगी देण्याचे निर्देश न्यायालयाने महिलेचा पतीला दिले होते. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता.

हेही वाचा – Junior Doctor’s Death : अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणीचा मृतदेह; सरकारी रुग्णालयात डॉक्टरची निर्घृण हत्या!

घटस्फोटानंतर महिलेचे गावातीलच राजाराम साहू नावाच्या व्यक्तीशी प्रेम संबंध जुळले. तिने त्याच्याकडेही पैशांसाठी तगादा लावला होता. त्याने तिला दीड लाख रुपये आणि काही इलेट्रॉनिक्स वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या. त्यानंतरही ती सातत्याने त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा घटस्पोटित पती आणि प्रियकर दोघेही एकमेकांना ओळखत होते. दोघेही महिलेच्या पैसे मागण्याच्या स्वभावाला कंटाळले होते. अखेर दोघांनी एक महिन्यापूर्वी महिलेची हत्या करण्याची योजना आखली. त्यापूर्वी दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी आणि पुरावे कसे नष्ट करावे, यासाठी अजय देवगन यांचा दृष्यम हा चित्रपट बघितला.

हेही वाचा – Mumbai Crime : प्रेयसीवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रियकराला अटक; “चल तुला घरी सोडतो” असं सांगितलं, आणि…

अखेर ठरल्याप्रमाणे १९ जुलै रोजी महिलेचा प्रियकर राजाराम हा महिलेला घनीखुटा येथील जंगलात घेऊन गेला. तिथे महिलेचा घटस्फोटित पतीही उपस्थित होता. दोघांनी महिलेच्या साडीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर दोघांनी तिचा मृतदेह जमिनीत पूरला. तसेच तिची दुचाकी आणि मोबाईल फोन जवळच्या एका खाडीत फेकले. याशिवाय महिलेचे दागिणे एका ठिकाणी लवपून ठेवले.

दरम्यान, २२ जुलै रोजी महिलेच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेतला. तसेच तिच्या मोबाईल रेकॉर्डवरून दोन्ही आरोपींपर्यंत पोहोचले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आता दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.