scorecardresearch

चीनमध्ये तब्बल २० हजार कर्मचारी ऑफिसमध्येच रहायला गेले, मागवण्यात आल्या हजारो Sleeping Bags; कारण…

विशेष म्हणजे कंपन्यांनीच या कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याची तसेच राहण्याची सोयही केली आहे.

China Corona
करोनाचा संसर्ग चीनमध्ये पुन्हा वाढलाय (फाइल फोटो, सौजन्य रॉयटर्स)

संपूर्ण युरोपसहीत चीनमध्येही करोनाच्या संसर्गाची लाट पुन्हा एकदा आलीय. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा करोना झपाट्याने पसरतोय. याच पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आलीय. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत आर्थिक घडामोडींचं देशातील सर्वात महत्वाचं केंद्र असणाऱ्या शांघाईमध्येही सेमी लॉकडाउन जारी करण्यात आलाय. करोनाच्या या नव्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेचा बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अर्थव्यस्थेचा गाडा सुरळीत सुरु ठेवण्यास हातभार लावण्यासाठी अनेक ठिकाणी कंपन्यांमध्येच कर्मचारी राहत असल्याचं चित्र दिसत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय केलीय.

कुठे घडतंय हे सारं?
शांघाईमधील लुजियाझुई येथे जवळवजळ २० हजार कर्मचारी, बँकर्स आणि व्यापारी त्यांच्या कार्यालयांमध्येच वास्तव्यास आहे. कंपनीमध्ये दिवसभर काम करुन नंतर लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये बाहेर पडता येत नसल्याने या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय कंपन्यांनी कामाच्या जागीच करुन दिलीय. हजारोंच्या संख्येने स्लीपिंग बॅग मागवण्यात आल्यात. या कर्मचाऱ्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आलीय.

किती रुग्ण आढळून आले?
मंगळवारी चीनमध्ये करोनाचे ४ हजार ४७७ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळेच लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू बसू लागलाय. म्हणूनच आता कर्मचाऱ्यांना काम करता येईल अशा सर्व सोयी कामाच्या जागीच उपलब्ध करुन देण्यासाठी कंपन्या आणि सरकारी यंत्रणांचं प्राधान्य आहे.

कसे आहेत नियम?
एकीकडे चीनकडून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असताना दुसरीकडे याचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरुन टीका केली जात असल्याचं एपीने दिलेल्या वृत्तात म्हटलेलं. शांघाईमधील पुडाँग हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंबंधी माहिती दिली आहे. नागरिकांना घरातच थांबावं लागणार असून इतरांशी संपर्क होऊ नये यासाठी सामान चेक पॉइंटवर ठेवलं जाणार आहे. अत्यावश्यक नसणारी कार्यालयं आणि सर्व व्यवसाय बंद राहतील. तसंच सार्वजनिक वाहतूक बंद केली जाणार आहे, असं प्रशासनाने स्पष्ट केलंय.

आधीच लागू करण्यात आलेत निर्बंध
याआधीच चीनमध्ये २.५ कोटींहून जास्त लोकांना लॉकडाउनध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना करोनासाठी अनेक चाचण्या कराव्या लागत आहेत. शांघाईमधील डिस्ने थीम पार्क याआधी बंद करण्यात आलेल्या व्यवसायांपैकी एक आहे.

संसर्गाची शक्यता जास्त
चीनमध्ये या महिन्यात ५६ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिलिनमधील ईशान्य प्रांतांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शांघाईमध्ये त्या तुलनेत कमी रुग्ण आहेत. असं असलं तरी लोकसंख्येची घनता पाहता शांघाईमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्गाची भीती असल्याने जास्त काळजी घेतली जात आहे.

शून्य रुग्ण मोहीम आणि लॉकडाउन
चीनमधील गेल्या दोन वर्षातील सर्वात वाईट परिस्थिती असून बिजिंगकडून शून्य रुग्ण व्हावेत यासाठी मोहिम अवलंबली जात आहे. लॉकडाउन आणि निर्बंध हे सध्या तरी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचं सर्वात फायदेशीर आणि प्रभावी प्रतिबंधक धोरण असल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक शहरं लॉकडाउनमध्ये
याचबरोबर शून्य करोना रुग्ण या मोहिमेअंतर्गत लॉकडाउनसोबतच मोठ्या प्रमाणात चाचण्यांची गरज असून संपर्कात आलेल्यांना घरी किंवा सरकारी ठिकाणी क्वारंटाइन केलं जात आहे. या धोरणामध्ये शक्य तितक्या लवकर विषाणूचे समुदाय संक्रमण निर्मूलन करण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. यासाठी शहरंही लॉकडाउन केली जात आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In china shanghai bankers and traders sleep in offices to beat covid lockdown scsg