पंजाबमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्षपदावरून पुन्हा एका प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही. निर्णय कोण घेत आहे? हे आम्हाला माहिती ना्ही.”, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या विधानासह त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्याची मागणी देखील केली.

“मी तुमच्याशी त्या काँग्रेसजनांच्या वतीने बोलत आहे, ज्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समितीला पक्षाध्यक्षांच्या निवडीसाठी पत्र लिहिलं होतं. आम्ही अजूनही प्रतिक्षेत आहोत.”, असंही कपिल सिब्बल यांनी पुढे सांगितलं. “आम्ही जी हुजूर वाले २३ नेते नाहीत. हे स्पष्ट आहे. आम्ही या विषयावर बोलत राहणार आहोत. आम्ही आमची मागणी धरून ठेवू.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. “पाकिस्तानच्या सीमेपासून ३०० किलोमीटर पंजाबमध्ये काय होत आहे? आम्हाला तिथल्या परिस्थितीची माहिती आहे. आम्हाला इतिहास माहिती आहे. आम्हाला माहिती आहे, तिथे अतिरेकाचा उदय कसा झाला. काँग्रेसने निश्चित केलं पाहीजे की, एकजूट आहोत.”, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस पक्षाच्या जी-२३ नेत्यांनी मागच्या वर्षी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाच्या सूचना केल्या होत्या. त्यावरून काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या नेत्यांना खडे बोल सुनावले होते. जी २३ मधील नेते करोनाकाळात बेपत्ता होते, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. त्याला कपिल सिब्ल यांनी उत्तर दिलं होतं. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक २३ जूनला होणार होती. मात्र करोनाचं कारण देत पुन्हा एकदा निवडणूक टाळण्यात आली होती. तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आला होता. विशेष म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळे पुढची तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद राहाणार आहे.

पंजाबमधील घडामोडींमुळे पाकिस्तान खूश”; सिद्धू यांचं नाव न घेता मनिष तिवारींची टीका

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांच्यावर बोट दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान राहुल गांधी यांचं मन वळवण्याचे अनेकांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे नवा अध्यक्ष मिळेपर्यंत हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आलं आहे. राहुल गांधी १६ डिसेंबर २०१७ ते १० ऑगस्ट २०१९ या कालावधीत काँग्रेसचे अध्यक्ष होते.