काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. रॉबर्ट वढेरा यांच्यावर तुम्हाला कारवाई करायची आहे. तुमच्याकडे सर्व साधनेही आहेत. पण कधी पंतप्रधान स्वत: राफेलवर एकतरी शब्द बोलले आहेत का? रॉबर्ट वढेरा तपासात सहकार्य करत आहेत. पण संपूर्ण देश जाणतो की पंतप्रधान मोदींनी राफेल करारात काय केले आहे. तरीही त्यांनी मौन बाळगले आहे. राफेल आणि देसॉल्टच्या कागदपत्रांमध्ये थेट पंतप्रधानांचे नाव आले आहे. त्यांची चौकशी झालीच पाहिजे. मोदी असोत की वढेरा भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसमोर केली.

ते म्हणाले, तुम्ही नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांचे नाव ऐकले आहे का? तुम्ही अनिल अंबानीचे नाव ऐकले आहे का ? या सर्वांनी मोदींना पैसे दिले आहेत. हे तुमच्या आई-वडिलांचे पैसे आहेत. रॉबर्ट वढेरा यांची चौकशी केली जात आहे. ते तपासात सहकार्य करत आहेत. मोदींचे नाव राफेलच्या कागदपत्रात आहेत. त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. यावर मोदींनी मौन बाळगले आहे.

सध्या भारतात विचारधारेची लढाई सुरू आहे. इथे दोन विचारधारांमध्ये युद्ध सुरू आहे. एक विचारधारा देशाला एकत्र करण्याच्या बाजूने आहे. सर्व देशवासी एकत्र यावेत, सुख, शांती नांदावी यासाठी ही विचारधारा प्रयत्नात आहे. तर दुसरी विचारधारा जी विद्यमान सरकार आणि पंतप्रधानांची आहे. एकाच विचारावर देश चालावा असे त्यांना वाटते. त्यांच्याकडे महिलांच्या समाजातील भूमिकेवर स्वत:चे विचार आहेत. भाषांवर त्यांचे विचार आहेत. संस्कृतीवर विचार आहेत पण इतर विचारांची त्यांच्याकडे कमतरता आहे.

मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, ते देशात भीतीचे वातावरण निर्माण करून देशाच्या आर्थिक प्रगतीवर चर्चा करू इच्छित नाहीत. आम्हाला देशाचा मूड बदलायचा आहे. कारण या देशाचा कल आर्थिक प्रगती करण्याकडे आहे. तुम्ही किती वेळा पंतप्रधान अशा पद्धतीने ३००० महिलांसमोर बोलताना पाहिले आहे, असा सवाल त्यांनी केला. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे ते कधी दिसलेत का, असे ते म्हणाले. तुम्ही मला सर ऐवजी राहुल म्हणू शकता? मला राहुल म्हणून हाक मारल्यास मला आपलंसं वाटेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.