Champai Soren : हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी चंपई सोरेन यांच्या हाती सोपवण्यात आली होती. मात्र, हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ३ जुलै रोजी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंपई सोरेन यांच्या मनाविरुद्ध त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला असून ते पक्षात नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तसेच ते भाजपात प्रवेश करणार, असंही सांगण्यात आलं. दरम्यान, सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता चंपई सोरेन यांनी भाष्य केलं आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले चंपई सोरेन?

“सत्ता मिळाल्यावर बाबा तिलका मांझी, भगवान बिरसा मुंडा आणि सिदो-कान्हू यांसारख्या वीरांना आदरांजली अर्पण करून मी राज्याची सेवा करण्याचा संकल्प केला होता. मी कधीही कोणावरही अन्याय केला नाही किंवा होऊसुद्धा दिला नाही. हूलच्या दुसऱ्या दिवशी माझे पुढील दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम पक्षनेतृत्वाने पुढे ढकलले. यापैकी एक कार्यक्रम दुमका येथे, तर दुसरा पीजीटी शिक्षकांना नियुक्ती पत्र वाटपाचा होता. याबाबत विचारलं असता, ३ जुलै रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे, तोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगण्यात आलं”, अशी प्रतिक्रिया चंपई सोरेन यांनी दिली.

हेही वाचा – Champai Soren : झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का? माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपाच्या वाटेवर?

“…म्हणून मला पर्यायी मार्ग शोधणे भाग पडले”

पुढे बोलताना, “मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम दुसऱ्याने रद्द करून घेण्यापेक्षा लोकशाहीत अपमानास्पद काही असू शकते का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच “या अपमानास्पद वागणुकीमुळे मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. ज्या पक्षासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्या पक्षात माझे अस्तित्वच नाही, असे मला वाटत होतं. इतका अपमान सहन केल्यानंतर मला पर्यायी मार्ग शोधणे भाग पडले”, असेही चंपई सोरेन म्हणाले.

“माझ्या स्वाभिमानाला धक्का लागल्याने भावूक झालो होतो”

“विधीमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मात्र, मला बैठकीचा अजेंडाही सांगण्यात आला नाही, एका बैठकीत माझा राजीनामा मागितला गेला. मला आश्चर्य वाटले, पण मला सत्तेची लालसा नव्हती, त्यामुळे मी तात्काळ राजीनामा दिला, पण माझ्या स्वाभिमानाला धक्का लागल्याने माझे मन भावूक झालं होतं”, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Jharkhand Train Accident : झारखंडमध्ये मुंबई-हावडा मेलचा अपघात; पाच डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी

“आता माझ्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत”

“गेल्या ४ दशकांच्या माझ्या राजकीय प्रवासात पहिल्यांदाच मी आतून तुटलो होतो. काय करावे समजत नव्हते. मी शांतपणे बसून दोन दिवस आत्मपरीक्षण केले, संपूर्ण घटनेत माझी चूक शोधली. सत्तेचा लोभही नव्हता, पण माझ्या स्वाभिमानाला झालेली ही जखम मी कोणाला दाखवू?” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच आता माझ्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत, असंही ते म्हणाले.