गेल्या काही महिन्यांपासून विदेशात हिंदू मंदिरांची विटंबना करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्येही अशाच प्रकारची घटना घडली आहे. न्यूयॉर्कच्या मेलव्हिले भागातील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या भींतीवर भारतविरोधी घोषणाही लिहिण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दुतावासानेही तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
भारतीय वाणिज्य दुतावासाने नेमकं काय म्हटलं?
भारतीय वाणिज्य दुतावासाने परिपत्रक जारी करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. न्यूयॉर्कमध्ये BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवतो, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच या घटनेबाबत अमेरिकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी या परिपत्रकात म्हटलं आहे.
हेही वाचा – कॅनडात खालिस्तानी समर्थकांकडून मंदिराची विटंबना; भित्तिचित्रे काढून विद्रूप करण्याचा प्रयत्न!
मंदिर प्रशासनाकडून शांतता राखण्याचं आवाहन
मंदिर प्रशासनानेही या घटनेबाबत दुख: व्यक्त केलं असून सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. काही समाजकंटकांनी न्यूयॉर्कच्या मेलव्हिल भागातील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड केली आहे. तसेच मंदिराच्या भीतींवर भारतविरोधी संदेश लिहिले आहेत. मागच्या काही दिवसांत उत्तर अमेरिकेतील काही मंदिरामध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांचा आम्ही निषेध करतो, तसेच अमेरिकी सरकारने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी करतो, अशी प्रतिक्रिया मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच आम्ही भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
गेल्या वर्षी नेवार्कमधील स्वामीनारायण मंदिराचीही विटंबना
दरम्यान, अमेरिकेत अशाप्रकारे मंदिराची विटंबना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी नेवार्क येथील स्वामीनारायण मंदिराच्या भितींवरही भारतविरोधी मजकूर लिहून त्याची विटंबना करण्यात आली होती. या मंदिराच्या भिंतींवर ‘खलिस्तान’ असा शब्द लिहिण्यात आला होता. त्यावेळी वर्णद्वेषातून हे कृत्य करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. या घटनेनंतर सॅनफ्रॅन्सिस्को येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने तीव्र निषेध केला होता. तसेच मंदिरावर भारतविरोधी मजकूर लिहिण्यात आला असून या घटनेने आमच्या भावना दुखावल्या आहे, असे मत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी व्यक्त केले होतं.