Bill Gates Divorce Pay Out : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी त्यांची पूर्व पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्या खासगी फाऊंडेशनला ८ अब्ज डॉलर्सची गुप्तपणे देणगी दिल्याचे वृत्त आहे. घटस्फोटाची पोटगी त्यांनी या संस्थेला दिली असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जगातील सर्वांत महागडा घटस्फोट म्हणून या प्रकरणाकडे पाहिलं जातंय. फोर्ब्सच्या अहवालानुसार कर दाखल करताना ही रक्कम समोर आलीय. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

अहवालानुसार, बिल गेट्सच्या देणगीमुळे २०२४ मध्ये पिव्होटल फिलान्थ्रोपीज फाऊंडेशनची मालमत्ता एक हजार टक्क्यांपेक्षा जास्त वाढून सुमारे ७.४ अब्ज डॉलर्स झाली आहे. २०२३ च्या अखेरीस ही संख्या ६०४ दशलक्ष डॉलर्स होती. न्यू यॉर्क टाईम्सच्या डीलबुकने प्रसिद्ध केलेल्या कर फाइलिंगनुसार, २०२४ मध्ये पिव्होटल फिलान्थ्रोपीज फाऊंडेशनला ७.८८ अब्ज डॉलर्सची देणगी देण्यात आली होती. फिलान्थ्रोपीज फाऊंडेशन महिला आणि कुटुंबांवर लक्ष केंद्रित करते.

बिल गेट्सबरोबर स्थापन केलेल्या संस्थेतून मेलिंडा बाहेर

बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला होता. तर, २०२४ मध्ये मेलिंडा औपचारिकरित्या बिल गेट्स यांच्याबरोबर सहस्थापन केलेल्या चॅरिटेबल फाऊंडेशनमधून बाहेर पडल्या होत्या. ७ जून २०२४ हा त्यांचा फाऊंडेशनमधील शेवटचा दिवस होता.

सहअध्यक्षपदावरून मेलिंडा निघून गेल्यानंतर फाऊंडेशनचे नाव बदलून गेट्स फाऊंडेशन असे ठेवण्यात आले. या फाऊंडेशनचे बिल गेट्स हे एकमेव अध्यक्ष आहेत.

 बिल आणि मेलिंडा यांची पहिली भेट १९८७ साली झाली होती. त्यावेळी मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सन १९९४ मध्ये या दोघांनी हवाई बेटांवरील लानी बेटावर लग्न केलं होतं. तर, २०२१ च्या मे महिन्यात दोघांचा घटस्फोट झाला होता. वॉशिंग्टन घटस्फोट कायद्यानुसार घटस्फोटासाठी याचिका दाखल झाल्यानंतर आणि अंतिम झाल्यानंतर दरम्यान ९० दिवसांचा प्रतीक्षा कालावधी निर्धारित करतात. न्यायालयाच्या रेकॉर्डनुसार किंग काउंटी, वॉशिंग्टन न्यायाधीशांनी विवाहाला अंतिम रूप दिले, ज्यामध्ये कोणत्याही पक्षाला ‘जोडीदार समर्थन’ (spousal support)  मिळणार नाही किंवा त्यांची नावे बदलणार नाहीत असे तपशीलवार नमूद केले आहे. न्यायाधीशांनी गेट्स यांना त्यांची मालमत्ता विभक्त कराराच्या अटींनुसार विभाजित करण्याचे आदेश दिले, जे घटस्फोटाच्या अटींनुसार गोपनीय राहते.