पाकिस्तानच्या राजधानीत इस्लामाबाद येथे शुक्रवारी नमाजाच्या वेळी एका शिया मशिदीत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला असून १६९ जण जखमी झाले आहेत. अलीकडच्या वर्षांतील शिया समाजावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी हा एक मानला जात आहे. हा शक्तिशाली स्फोट टारलाई भागातील खदिजतुल कुब्रा मशीद व इमामबारा येथे झाला. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आत्मघाती हल्लेखोराला इमामबाराच्या प्रवेशद्वाराजवळ थांबवण्यात आले होते. मात्र त्याने तेथेच स्फोट घडवून आणला. पोलीस सूत्रांनी सांगितले की हल्लेखोर हा परदेशी नागरिक होता आणि त्याचे फितना अल-ख्वारिजी या नावाने ओळखल्या जाणार्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेशी संबंध होते. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने ‘जिओ न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्याने प्रथम गोळीबार केला आणि त्यानंतर आत्मघातकी स्फोट घडवून आणला.
रुग्णालयांत आणीबाणी
स्फोटात जखमींची संख्या मोठी आहे. प्राप्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी राजधानी इस्लामाबादमधील रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ठिकठिकाणी सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
तीन महिन्यांत दुसरा हल्ला! हा हल्ला इस्लामाबादमधील जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर झालेल्या स्फोटानंतर तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत झाला आहे. त्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता.

