राजस्थानच्या शिक्षण विभागाने एका शिक्षक दाम्पत्यावर कारवाई करत त्यांना ९ कोटी ३१ लाख रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावली आहे. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हादेखील दाखल केला आहे. राजस्थानच्या बारान जिल्ह्यात ही घटना घडली असून या शिक्षक दाम्पत्यावर राज्य सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थानच्या बारान जिह्यातील विष्णू गर्ग आणि त्यांच्या पत्नी मंजू गर्ग हे दाम्पत्य गेल्या २८ वर्षांपासून शहरातील राजापुरास्थित एका शाळेत शिक्षक आहेत. मात्र, त्यांनी स्वत: मुलांना न शिकवता त्यांच्या जागी डमी शिक्षकांना कामवर ठेवले. गेल्या २८ वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.

हेही वाचा – जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले, व्हिडीओ बनवला, मग इतर महिलांबरोबर…; तरुणाची १२ पानी सुसाईड नोट वाचून पोलीसही चक्रावले!

महत्त्वाचे म्हणजे सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेची तपासणी केली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी शिक्षक दाम्पत्याचा पगार रोखत त्यांच्यावर कारवाई करण्यात आल होती. तसेच डमी शिक्षक म्हणून काम करणाऱ्या तीन शिक्षकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, राजस्थानमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर याप्रकरणी शिक्षक दाम्पत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर या मागणी दखल घेत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने या शिक्षक दाम्पत्यावर कारवाई केली आहे. शिक्षक विभागाच्या तक्रारीनंतर या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना एकूण ९ कोटी ३१ लाख रुपयांची रिकव्हरी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार आता त्यांच्याकडून ९ कोटी ३१ लाख रुपये वसूल केले जाणार आहेत.

यासंदर्भात बोलताना राजस्थानचे शिक्षामंत्री म्हणाले, अशा शिक्षकांवर कारवाई करून राजस्थान सरकारने आदर्श निर्माण केला आहे. राज्य सरकार या शिक्षकांकडून ९ कोटी ३१ लाख रुपये वसूल करणार आहेत. यामध्ये विष्णू गर्ग यांच्याकडून ४ कोटी ९२ लाख तर मंजू गर्ग यांच्याकडून ४ कोटी ३८ लाख रुपये वसूल केले जाणार आहेत.

हेही वाचा – “मुलीची अंतर्वस्त्रे काढणे, स्वतः नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही तर..”, राजस्थान हायकोर्टाने निर्णयात सांगितले बलात्काराचे तीन टप्पे

विशेष म्हणजे या दोघांचा महिन्याचा एकूण पगार जवळपास दीड लाख रुपये होता. मात्र, त्यांनी १५ हजार रुपयांनी तीन डमी शिक्षक कामावर ठेवले होते, असं सांगितलं जात आहे.