Jaipur Crime News : स्वत:च्या मुलीचा बलात्कार करणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी चक्क वडिलांनीच तिची जन्मतारीख बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह शाळेच्या प्राचार्यालाही अटक केली आहे. तसेच शाळेच्या प्राचार्याविरोधात फसवणुकीच्या वेगळा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीला दोन लाख रुपयांत विकले

द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, जयपूर जिह्यातील देवरिया भागात राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीला जुलै महिन्यात तिच्या काकूने संदीप यादव नावाच्या एका व्यक्तीला दोन लाख रुपयांमध्ये विकले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीने केला होता. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रारही नोंदवली होती. मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी संदीप यादवला पोलिसांनी अटकही केली. तसेच त्याच्या विरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयात आरोपीला पोक्सो काद्यातून वाचवण्यासाठी चक्क मुलीच्या वडिलांनीच तिची जन्मतारीख बदलली.

हेही वाचा – Rajsthan Rape Case : धक्कादायक! मंदिरात झोपलेल्या तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार; आई-वडिलांना पहाटे आढळली गुंडाळलेल्या फडक्यात!

पोलीस निरीक्षक सुनील कुमार जहांगीर म्हणाले…

यासंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक सुनील कुमार जहांगीर म्हणाले, ज्यावेळी पीडित मुलीने तक्रार दाखल केली, तेव्हा प्राथमिक चौकशीत ती अल्पवयीन असल्याचे पुढं आलं. मात्र, ज्यावेळी तिच्या शाळेच्या दाखल्यासह इतर कागदपत्रे समोर आली, तेव्हा २१ वर्षांची असल्याचे निर्देशनास आलं. त्यामुळे कागदपत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा संशय आम्हाला आला. आम्ही याची सखोल चौकशी केली. तसेच ही कागदपत्रे तपासणीसाठी जयपूर येथे पाठवण्यात आलं. या चौकशीत शाळेच्या दाखल्यावर तिच्या जन्मतारखेबाबत छेडछाड करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

मुलीच्या वडिलासह शाळेच्या प्राचार्यालाही अटक

पुढे बोलताना, आम्ही संबंधित शाळेच्या प्राचार्याला विचारपूर केली तेव्हा तिच्या वडिलांनी जन्मतारीख २०१० वरून २००३ करण्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी शाळेच्या प्राचार्यासह मुलीच्या वडिलालाही अटक केली, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, आरोपींना न्यायालयात दाखल केलं असता न्यायालयाने त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – शाळेच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमधील गणेश चतुर्थीची पोस्ट डिलीट केल्याने पालकांचं आंदोलन, मुख्यध्यापकाला अटक; नेमका कुठं घडला प्रकार?

राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान, राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जोधपूरमध्ये मंदिराबाहेर झोपलेल्या या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. त्यानंतर जोधपूरमधील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातही एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे पुढं आलं होत. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता बलात्कार करणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी चक्क वडिलांनीच पीडित मुलीची जन्मतारीख बदलल्याचा घटनी पुढे आली आहे. त्यामुळे आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.