दक्षिण काश्मीरच्या त्राल या संवेदनशील भागात काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेली क्रिकेट स्पर्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल दोन महिने सुरू असलेल्या या स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. मात्र, या स्पर्धेच्या आयोजनामागील प्रेरणा आणि सहभागी संघांची नावे अनेकांच्या भुवया उंचवणारी आहेत. हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर बुरहान मुझफ्फर वानी याचा भाऊ खालिद मुझफ्फर वानी यांच्या स्मरणार्थ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय लष्कराने गेल्यावर्षी पुलवामा जिल्ह्यातील जंगलात केलेल्या कारवाईत खालिद मुझफ्फर मारला गेला होता. खालिद दहशतवादी होता आणि तो त्याच्या भावाला भेटण्यासाठी या भागात आला होता, असे भारतीय सैन्याने त्यावेळी सांगितले होते. मात्र, भारतीय लष्कराने दहशतवादी ठरवूनही त्याच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १६ संघांपैकी तीन संघाची नावेदेखील हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांच्या नावांपासून प्रेरणा घेऊन ठेवण्यात आली होती. बुरहान लायन्स या संघाच्या नावामागे हिजबुलच्या बुरहान याची प्रेरणा होती. बुरहान हा क्रिकेटप्रेमी होता आणि २०१० मध्ये तो हिजबुलमध्ये सहभागी झाला होता. सध्याच्या घडीला तो काश्मीरमधील दहशतवादी चळवळीच्या मुख्य चेहऱ्यांपैकी एक आहे. अबिद खानपासून प्रेरणा घेऊन अबिद खान कलंदर्स हा संघ स्पर्धेत सहभागी झाला होता. अबिद खान हा हिजबुलचा कमांडर होता आणि त्याने एका भारतीय सैन्यातील एका कर्नल पदावरील अधिकाऱ्यालाही मारले होते. यानंतर भारतीय सैन्याने २०१४ मध्ये केलेल्या कारवाईत तो मारला गेला होता. याशिवाय, खलिद मुझफ्फर वानीपासून प्रेरणा घेतलेला खलिद आर्यन्स संघदेखील स्पर्धेत सहभागी झाला होता. या संघानेच स्पर्धेचे जेतेपद पटकावले. याशिवाय, २२ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यातदेखील स्वतंत्र काश्मीरचे समर्थन करणारी गाणी गाण्यात आली होती. हंडेवारा जिल्ह्यातील हिंसाचारामुळे या स्पर्धेचा कालावधी काही काळासाठी लांबला होता. अखेर मागील रविवारी तब्बल १००० प्रेक्षकांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप झाला. ही स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी स्पर्धा सुरू असलेल्या ईदगाड मैदानापासून पोलीस आणि भारतीय लष्कराला दोन महिने लांब ठेवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या नावाने सहभागी संघांबद्दल विचारण्या आले असता याठिकाणी ही गोष्ट सामान्य असल्याचे आयोजकांनी सांगितले.



