पोप फ्रान्सिस यांनी रविवारी पुन्हा एकदा युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा निषेध केला आणि मुलांच्या रुग्णालयांवर आणि नागरी लक्ष्यांवर बॉम्बफेक करणे हे एक रानटी कृत्य असल्याचे म्हटले आहे. “देवासाठी तरी हे हत्याकांड थांबवा,” असं पोप साप्ताहिक अँजेलस प्रार्थनेनंतर म्हणाले.
रशियन आणि युक्रेनियन सैन्यांमध्ये सलग १८ व्या दिवशी संघर्ष सुरू असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पोप पुढे म्हणाले, युक्रेनियन शहरे स्मशानभूमीत रुपांतरित होण्याचा धोका आहे. पोप यांनी रशियाला युक्रेनवरील आक्रमण ताबडतोब थांबवण्याचे आवाहन हे दुसरे आवाहन आहे, ज्याला त्यांनी ‘सशस्त्र आक्रमण’ म्हटले आहे. ६ मार्च रोजी त्यांनी मॉस्कोचे आक्रमण लष्करी कारवाई असल्याचा दावा फेटाळून लावला होता.
“युक्रेनमध्ये रक्त आणि अश्रूंच्या नद्या वाहत आहेत. हे केवळ लष्करी ऑपरेशन नाही तर एक युद्ध आहे जे मृत्यू, विनाश आणि दुःखाकडे नेत आहे,” ते म्हणाले होते. ल्विव्हमधील युक्रेनच्या लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात किमान ३५ लोक ठार झाले आणि १३४ जण जखमी झाले, अशी बातमी रॉयटर्सने दिली.
प्रादेशिक गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांच्या म्हणण्यानुसार, रशियन विमानांनी ३० रॉकेट गोळीबार केल्याचा आरोप आहे, आणि त्यापैकी काही लक्ष्यांवर आदळण्यापूर्वीच रोखण्यात आले.