उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि राज्याचा विकास साध्य करण्यासाठी हे धोरण लागू करत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. या धोरणावर संमिश्र प्रतिक्रिया येत असून खुद्द विश्वि हिंदू परिषदेने देखील यातील काही तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, लोकसंख्या नियंत्रण धोरण आणलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ३०४ आमदारांपैकी पक्षाच्या १५२ आमदारांना तीन किंवा त्याहून अधिक मुलं आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे भाजपाच्या एका आमदाराला आठ मुले आहेत तर दुसर्‍या एका महिला आमदारास सात मुले आहेत. तसेच ८ आमदार असे आहेत ज्यांना प्रत्येकी सहा मुले आहेत. याशिवाय भाजपाचा मित्रपक्ष आपणा दल पक्षाच्या आमदारालाही ८ मुले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत या आमदारांविषयी जाणून घेणे महत्वाचे आहे.

“लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून अतुलचं…”; जितेंद्र आव्हाड यांचा योगींना टोला!

कोण आहेत हे आमदार

  • सहयोगी असलेल्या आपणा दलाचे आमदार हरीराम यांना आठ मुलं आहेत. त्यात चार मुले आणि चार मुली आहेत. जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी त्यांनी ट्विटरवरही लिहिले होते की आपण सर्वांना लोकसंख्या नियंत्रणाबद्दल जागरूक केले पाहिजे.
  • दुसरीकडे शाहजहांपूर जिल्ह्यातील तिल्हार मतदारसंघातील भाजपाचे आमदार रोशनलाल वर्मा हे ८ मुलांचे वडील आहेत. त्यात तीन मुले आणि पाच मुली आहेत. २०१७ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
  • नानपारा विधानसभेतील भाजपा आमदार माधुरी वर्मा यांना सहा मुली होत्या. त्यांना सातवा मुलगा झाला ज्याचे नाव अजमेरी वर्मा ठेवले.
  • गोंडा जिल्ह्यातील कर्नलगंज मतदारसंघातील भाजपाचे आमदार कुंवर अजय प्रताप सिंह यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. २०१७ मध्ये निवडणुका जिंकून ते सहाव्यांदा आमदार झाले आहेत.
  • यूपीच्या लखीमपूर जिल्ह्यातील धौरहरा सीटचे आमदार बाळ प्रसाद अवस्थी यांना सहा मुलं आहेत. त्यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत. ते २०१७ मध्ये चौथ्यांदा आमदार झाले आहेत.
  • याशिवाय फतेहपूर जिल्ह्यातील खागा मतदारसंघातील भाजपाचे आमदार कृष्णा पासवान यांनाही तीन मुले आणि तीन मुली आहेत. २००२ मध्ये प्रथमच निवडणूक जिंकल्यानंतर ते आतापर्यंत तीन वेळा आमदार राहिले आहेत.
  • कन्नौज जिल्ह्यातील तिरवा मतदारसंघातील भाजपाचे आमदार कैलाससिंग राजपूत यांना दोन मुले आणि चार मुली आहेत. २०१७ मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झालेत. त्यांनी १९९६ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुका देखील जिंकल्या आहेत.
  • याशिवाय मिर्झापूर जिल्ह्यातील मिर्झापूर मतदारसंघातील भाजपाचे आमदार रत्नाकर मिश्रा यांना चार मुली आणि दोन मुले आहेत.
  • मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव मतदारसंघातील भाजपाचे आमदार राम नरेश अग्निहोत्री यांना दोन मुले आणि चार मुली आहेत.
  • मेरठ जिल्ह्यातील मेरठ कॅंट मतदारसंघातील भाजपचे आमदार सत्य प्रकाश अग्रवाल यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत.

काय आहे हे लोकसंख्या धोरण?

लोकसंख्या नियंत्रण विधेयकाच्या मसुद्यात म्हटले आहे की, दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्यास सरकारी नोकरी आणि सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जावे. दोन अपत्यांच्या धोरणाचे पालन न करणाऱ्यांना सर्व भत्त्यांपासून वंचित ठेवले जावे. तसेच, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येणार नाही. शिवाय सरकारी नोकरीसाठी अर्ज देखील करता येणार नाही आणि बढती देखील मिळणार नाही. कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेता येणार नाही.

याशिवाय विधेयकाच्या मुद्यामध्ये असे देखील म्हटले आहे की, जे सरकारी नोकर दोन अपत्ये धोरणाचा अवलंब करतील त्यांना संपूर्ण सेवाकाळात दोन अतिरिक्त वेतनवाढी आणि १२ महिन्यांची पितृत्व/मातृत्व रजा पूर्ण वेतन आणि भत्त्यांसह दिली जाईल. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजनेखाली सरकारकडून मिळणाऱ्या निधीत तीन टक्के वाढ केली जाईल. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य लोकसंख्या निधी स्थापन करण्यात येणार आहे.