गुजरात काँग्रेसच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत फुटीच्या भीतीनं काँग्रेसनं आपल्या ४० हून अधिक आमदारांना कर्नाटकातील ज्या रिसॉर्टमध्ये लपवलं आहे, त्या रिसॉर्टवर आयकर विभागानं आज सकाळी छापा टाकला. कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट आहे. ही छापेमारी का करण्यात आली यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही.

आयकर विभागानं सकाळी ७ वाजताच शिवकुमार यांच्या मालकीच्या इगलटोन या रिसॉर्टवर छापा टाकला. रिसॉर्टमधील खोल्यांची झडती घेण्यात येत आहे. गुजरातमधील काँग्रेसचे आमदार याच रिसॉर्टमध्ये वास्तव्याला आहेत. काँग्रेस हायकमांडचे विश्वासू मानले जाणारे शिवकुमार यांच्यावर गुजरातमधील पक्षाच्या आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, आता तेच शिवकुमार आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. गुजरात काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला. त्यातील तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये फुटीचे वारे वाहू लागल्यानं खबरदारी म्हणून काँग्रेसनं आपल्या आमदारांना रातोरात कर्नाटकात पाठवलं होतं. ते याच इगलटोन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत.