Income Tax Section 56 Same Sex Couple Gift Taxation: काळा पैसा पांढरा करणे आणि कर चुकवेगिरी रोखण्यासाठी सरकारने आयकर कायदा, १९६१ मध्ये कलम ५६(२) (एक्स) आणले होते. या कलमानुसार जर एखाद्या व्यक्तीला ५०,००० रुपयांहून अधिकच्या किमतीची भेट वस्तू किंवा रोख रक्कम मिळाल्यास त्यावर कर लावला जातो. या कलमाला काही अपवादही आहेत. जसे की, नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तू कर मुक्त असतात. यावरूनच सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात एक वाद सुरू आहे. समलैंगिक जोडप्याने दिलेले सोन्याचे ब्रासलेट ही भेटवस्तू नसून उत्पन्न आहे, असा दावा केला गेला. यानंतर या समलैंगिक जोडप्याने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका करून आयकर कायद्यातील ‘जोडीदार’ या शब्दाचा आधार घेतला आहे.
आयआयटीचे माजी विद्यार्थी असलेल्या अनुराग कालिया आणि अखिलेश गोदी यांनी आयकर कायद्याच्या कलम ५६(२) (एक्स) च्या पाचव्या तरतुदीच्या घटनात्मक वैधतेला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने या याचिकेबद्दल मंगळवारी केंद्र सरकारचा अभिप्राय मागितला. या तरतुदीनुसार, वैवाहिक जोडप्याने एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू करामधून मुक्त आहेत. पण या तरतुदीचा शब्दशः अर्थ घेतला असून समलैंगिक जोडप्याला यातून वगळले जात आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
प्रकरण काय आहे?
अखिलेश गोदी यांना १४.४१ ग्रॅमचे २२ कॅरेटचे सोन्याचे ब्रासलेट त्यांच्या वडिलांकडून मिळाले होते. हे ब्रासलेट त्यांनी कालिया यांना भेट म्हणून दिले. या ब्रासलेटची किंमत १ लाख १५,५०० असल्याचे जोडप्याने सांगितले.
कलम ५६(२) (एक्स) नुसार, जर एखाद्याकडून ५०,००० हून अधिक किमतीच्या वस्तू किंवा थेट रोख रक्कम मिळाली, तर ती कर पात्र उत्पन्न म्हणून ग्राह्य धरली जाईल. या कलमाला काही अपवादही आहेत. पती, पत्नी, भाऊ, बहीण, आई-वडील किंवा कुटुंबातील इतर नातेवाईकांनी दिलेल्या भेटवस्तूंवर मात्र कर लागत नाही.
जोडप्याचा मुद्दा काय?
जर दोन पुरूषांनी लग्न केले आहे किंवा भिन्न लिंगी जोडपे लग्नाशिवाय जर बराच काळ एकमेकांसह राहत असतील तर अशावेळी संबंधितांनी दिलेल्या भेट वस्तू या कर पात्र ठरविल्या जाऊ नयेत किंवा त्यांची कर विवरण पत्रात माहिती देण्याची आवश्यकता नाही, असे जोडप्याने याचिकेत म्हटले आहे.
याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या वर्षाचे कर विवरणपत्र तयार करताना त्यांना ब्रासलेटच्या बाजारभावानुसार कर भरण्याचा सल्ला दिला गेला. या ब्रासलेटच्या बाजारभावानुसार २५ टक्के कर, १५ टक्के अधिभार आणि ४ टक्के उपकर भरण्यास सांगितले गेले.
जोडप्याने याचिकेत म्हटले की, ते दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून सात वर्षांहून अधिक काळ बंगळुरूत एकत्र राहत आहेत. दोघांच्या नावावर बंगळुरूत एकच घर आहे. त्यामुळे ते लग्नाप्रमाणेच एकमेकांचे जोडीदार आहेत.
